प्राणायाम सिद्ध करायची घाई करू नये
अध्याय चौथा
प्राणायामच्या माध्यमातून मनुष्य त्याच्या श्वासाची गती नियंत्रित करत असतो. असं म्हणतात की, माणसाचं आयुष्य ठरलेलं आहे. म्हणजे त्यानं किती श्वासोच्छ्वास करायचे हे ठरलेलं असतं पण त्याची गती किती ठेवायची हे मनुष्य प्राणायामचा सराव करून ठरवू शकतो. म्हणून आजही कित्येक तपस्वी शेकडो वर्षे जगून तपश्चर्या करत असतात. बाप्पा श्वास नियंत्रित करण्यासाठी लघु, मध्यम व उत्तम असे प्राणायामचे तीन प्रकार सांगतात आणि सुचवतात की, हा अभ्यास तज्ञ अशा योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावा. कारण श्वास नियंत्रित करायचं काम वाघसिंहांना मवाळ करण्याएव्हढंच अवघड आहे. पुढील श्लोकात बाप्पा प्राणायाम सिद्ध केल्यावर मिळणाऱ्या फायद्याबद्दल सांगत आहेत.
पीडयन्ति मृगास्ते न लोकान्वश्यं गता नृप ।
दहत्येनस्तथा वायुऽ संस्तब्धो न च तत्तनुम् ।।31 ।।
अर्थ-हे नृपा, वश झालेले पशु ज्याप्रमाणे लोकांना पीडा देत नाहीत त्याप्रमाणे वश झालेले प्राण व अपान लोकांना पीडा देत नाहीत.
विवरण- बाप्पा म्हणाले, प्राण आणि अपान यांना रोधून धरण्याचा अभ्यास म्हणजे प्राणायाम. प्राणायामने श्वासोच्छ्वास नियंत्रित होतात. त्यामुळे माणसाच्या शरीराचं चक्र बरीच वर्षे सुस्थितीत राहतं. मन स्वस्थ होतं. शरीराच्या अवयवांची कार्यक्षमता वाढून मेंदू तल्लख होतो. वृत्ती समाधानी होते. आत्मविश्वास वाढतो. भीती नष्ट होते. चित्त एकाग्र होऊन ध्यानधारणा सुलभ होते. शरीरव्याधी त्याच्यापासून चार हात दूर राहतात. माणूस स्वत:चे हट्ट पुरवण्यासाठी स्वत:च्या शरीराला वाटेल तसे ताबडत असतो, त्यामुळे थकलेले शरीर कुरकुर करू लागते. त्याला अनेक व्याधी जडतात पण प्राणायामने जर त्याने श्वासावर नियंत्रण मिळवले तर त्याचं मन स्वस्थ होतं. त्याच्या इच्छाआकांक्षाना आपोआप वेसण बसते. त्यामुळे त्याच्या शरीराचे चक्रही न कुरकुरता चालू राहते. इथं बाप्पा पुन्हा एकदा शरीराला नियंत्रित करण्याची तुलना वाघसिंहांना नियंत्रित करण्याशी करतात व सुचवतात की, जर वाघसिंहांना नियंत्रित केले तर ते मवाळ होऊन कुणाला त्रास देत नाहीत. त्याप्रमाणे प्राणयाममुळे शरीरव्याधी आटोक्यात राहून माणसाला त्रास देत नाहीत. तसेच स्वस्थ मनामुळे माणसाच्या इच्छा त्याच्या काबूत येऊन पुढील पापाचरण घडून देत नाहीत. अर्थातच हे काम सोपे नसल्याने ते क्रमाक्रमाने साध्य करावे असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
यथा यथा नरऽ कश्चित्सोपानावलिमाक्रमेत् ।
तथा तथा वशीकुर्यात्प्राणापानौ हि योगवित् ।। 32 ।।
अर्थ-ज्याप्रमाणे एखादा मनुष्य जिन्याच्या पायऱ्या एकामागून एक क्रमाने चढून जातो त्याप्रमाणे प्राण व अपान यांना क्रमाने योगज्ञ मनुष्याने वश करावे.
विवरण-मनुष्याला एखादी नवीन गोष्ट समजली की, ती आपल्याला करता यावी अशी लहान मुलाप्रमाणे इच्छा होते पण कोणतीही गोष्ट गडबडीने करायला गेलं की त्याचा विचका होतो. मनाला आवडलेली गोष्ट साध्य होत नाही असं लक्षात आलं की, ज्या घाईगडबडीनं मनुष्य ती आत्मसात करायला जातो तितक्याच घाईनं तो ती करायचा प्रयत्न सोडून देतो. मनुष्य स्वभावाचं अचूक निरीक्षण बाप्पा करतात आणि म्हणून ते सल्ला देतात की, प्राणायाम सिद्ध करायची कोणतीही घाई करू नका. घाई केलीत तर निराशा पदरी पडण्याची जास्त शक्यता आहे हे लक्षात घेऊन ज्याप्रमाणे जिना चढून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मनुष्य एक एक पायरी चढून वर जातो त्याप्रमाणे प्राणायाम सिद्ध करण्यासाठी योगगुरूंच्या मार्गदर्शनाखाली टप्प्याटप्प्याने पुढे जावे. म्हणजे योग्य दिशेने प्रगती होऊन प्राणायामची कला साध्य होऊन शरीर स्वस्थ राहील व ध्यानधारणा मनासारखी होईल.
क्रमश: