मुलांच्या शाळेच्या वेळेत खेळण्याची वेळ कमी करू नका
राज्य बाल हक्क आयोगाचे शिक्षण खात्याला निर्देश
बेंगळूर : राज्यातील मुलांसाठी शाळेच्या वेळेत खेळण्याचा वेळ कमी करू नये, असे निर्देश कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाने शालेय शिक्षण खात्याला दिले आहेत. या संदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य डॉ. के. टी. तिप्पेस्वामी यांनी शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राज्य बाल हक्क आयोगाने राज्यातील विविध भागातील मुलांशी संवाद साधला असता इयत्ता दहावीच्या मुलांना वेळापत्रकानुसार खेळण्याचा वेळ आयोजित करत नाहीत, असे निदर्शनास आणून दिले आहेत.
मी स्वत: अनेक माध्यमिक शाळेच्या मुलांशी चर्चा केली असता वरील बाब उघडकीस आली आहे. खेळ, कला, संगीत यासारख्या अभ्यासक्रमेतर क्रियाकल्प मुलांच्या समग्र व्यक्तिमत्त्व विकासाचा अविभाज्य भाग आहेत. हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने दरवषी 11 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय खेळ दिन म्हणून मान्यता दिली आहे. दहावीच्या परीक्षेत चांगले निकाल मिळवायचे आहेत म्हणून अशा प्रकारे मुलांच्या खेळांवर निर्बंध घातले जात आहेत हे विडंबनात्मक आहे. याचा मुलांच्या शिक्षणावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.