महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मन ऐकेना...

06:18 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मळके, फाटके, अस्ताव्यस्त कपडे, शरीराला किती दिवस पाणी लागलं नसेल ते कोण जाणे असा भयंकर अवतार, हातात चिंधकाबोंधकांचं चिरगुट म्हणावं असं गाठोडं आणि स्वत:शीच हातवारे करत रस्त्यावर छिन्नमनस्क फिरणारी देवाची लेकरं पाहिली की स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याची लाज वाटते. प्रत्येक वेळी घशाशी आवंढा दाटून येतो. आरशात पाहताना ही सगळी तुझी सुद्धा जबाबदारी आहे असं कुणीतरी आपल्याला ओरडून ओरडून सांगतंय असं वाटतं. दिवसाची सुरुवात यांच्या दर्शनाने झाली तर दिवस कडू कडू होऊन जातो. त्यांच्या तशा अवतारामुळे नव्हे तर स्वत:च्या अपराधबोधामुळे. आणि एक अतिशय सुंदर गाणं आठवतं. अतिशय वेदनादायी अर्थाने.

Advertisement

मन ऐकेना ऐकेना

Advertisement

दुर्विकारी केली दैना

मन ऐकेना

रेव्हरंड टिळक तथा नारायण वामन टिळक यांची ही रचना आवडीने संगीत देऊन गायलीय डॉ. प्रतीक गायकवाड यांनी. किरवाणी रागाचा औदासिन्याचं परखड विश्लेषण करणारा मूड आणि सुगम संगीतातील बारकावे अतिशय सूक्ष्मपणे दाखवणारं हे गाणं ऐकत राहिलो तर दरवेळी वेगळे अर्थ निघतात. त्यातला मला अचानक सापडलेला हा वेगळाच अर्थ... छिन्नमनस्कता, अर्थात मनाचा कॅन्सर म्हणून ओळखला जाणारा स्किझोफ्रेनिआ हा महाभयंकर मनोविकार आहे. या विकाराने ग्रस्त माणसं ही इतक्या वाईट मनोवस्थेत जातात की अक्षरश: ठार वेडी होऊन ती रस्तोरस्ती भटकत राहू शकतात. घरच्या माणसांना त्यांना सहन करणं अशक्य होऊन बसतं. कितीही काहीही केलं तरी ती हातची रहात नाहीत. त्यांचं जगणं भंगून गेलेलं असतं. त्यांचं मन बाह्य जगापासून पूर्ण फारकत घेऊन कुठे गेलेलं असतं कोण

जाणे...

मन कोणाचे कोणाचे

देई देवाला देवाचे

खरंच...को:हम् ते सो:हम् चा प्रवास काहींनाच जमतो. काहींना अजिबात झेपत नाही. तर काहींना त्रिशंकू अवस्था प्राप्त होते. अशा मनोरुग्णांना पाहून मनात येतं की त्यांचं मन हे त्यांचं राहिलेलंच नसतं आणि म्हणूनच त्यांना पाहून प्रश्न पडतो की मन नक्की कोणाचं? कारण त्यांचं मन छिन्नविछिन्न असतं. ना त्याचा त्यांना उपयोग होतो ना दुसऱ्याला. मग काय? देई देवाला देवाचे. देवाशी अतिशय तादात्म्य पावलेल्या कितीतरी संत महात्म्यांची वृत्ती अगदी निरिच्छ निर्विकार असते. कधीकधी ते भाबडेपणाने ज्या कृती करतात त्यामुळे सर्वसामान्य समाज त्यांना वेड्यात काढत असतो.. ते मनचक्षूंनी ही गंमत निरखीत असतात. त्यांना भानच नसतं कारण त्यांनी देवाचं देवाला देऊन टाकलेलं असतं. उष्ट्या पत्रावळींवरचं अन्न वेचून खाणारे गजानन महाराज असोत किंवा सडलेला पाय त्यातल्या किड्यामुंग्यांसहित तसाच घेऊन फिरणारे मोरेबाबा असोत, किंवा स्वत:च्या मुलाच्या मृत्यूची बातमी भर कीर्तनात कळल्यावरही

असे किती गेले कोट्यानुकोटी

रडू काय येथे एकट्यासाठी?

म्हणत

गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा भान हरपून गजर करणारे गाडगेबाबा असोत, हे सगळे तसेही जगासाठी वेडेच होते.

असं वाटतं की देवाकडे जाता जाता रस्ता चुकलेला जीव अर्धवट वासना घेऊन जन्माला येतो. सर्वसामान्य माणसासारखं त्याच्या जगण्याचं प्रयोजन नसल्याने देवाने मन स्वत:कडे ठेवून त्याला पृथ्वीवर पाठवलेलं असतं की काय कोण जाणे? स्वत:चं मन शोधून शोधून दमलेले हे मनोरुग्ण पाहवत नाहीत. पुण्यात डॉ. सोनावणे अशा माणसांसाठी काम करतात. अजूनही काही मोजकी माणसं काम करतच असतात. पण विचार केला तर या बिचाऱ्या मनोरुग्णांचं गणितच वेगळं असतं. कित्येकदा त्यांना भास होतात. विचारप्रक्रियेत गोंधळ होतात. मग ते आक्रमक होतात. देवराई मधला शेष आठवतोय? तो सिनेमा म्हणजे अशा मन हरवलेल्या माणसांची फक्त एक झलक आहे. वास्तव याहूनही अधिक विदारक असतं. माझं मनच हरवलंय हो... असं सांगणारी माणसं डॉक्टरांना भेटतात तेव्हा ते सगळं कसं काय शांतपणे ऐकून घेऊ शकतात यांची कमालच वाटते. डॉ. मोहन आगाशे हे एक यातलं मोठ्ठं नाव आहे. त्यामुळे की काय देवराईमधली त्यांची भूमिका जास्तच खरी भासते.

देवाची लाडकी लेकरं कोण? तर शारीरिक मानसिक पंगु माणसं हीच होय! कारण त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि धडक्या मुलांपेक्षा मोडक्या मुलावर जीव जास्त असतो आईचा. मतिमंद मुलांच्या शाळेत जावं. स्वमग्न मुलं, सीमागत बुद्धिमत्तेची मुलं, अनाथ बालकं, जन्मत:च त्याग करून कचऱ्यात टाकून दिलेली दुर्दैवी अर्भक, यांच्या चेहऱ्यावरचे भाव किती निरागस असतात! यांना पाहून त्यांची दया येते त्यांच्याविषयी प्रेम वाटतं. आणि त्यांना टाकून देणाऱ्यांची अतिशय चीड येते. असं वाटतं की अशी कित्येक जोडपी असतात ज्यांना देव मूलच देत नाही आणि ज्यांना देतो त्यांना त्याची किंमत नसते. चूक कोणाचीही असो, पण त्यातून जन्माला आलेल्या जीवाला त्याची किंमत मोजावी लागते आणि हे फार दुर्दैवी असतं. आयुष्य म्हणजे नुसतं मजा करणं नसतं. त्यापेक्षा बरंच काही असतं. एका जीवाला या जगात आणणे, जन्माला घालणे ही जगातली खूप गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे याचा विसरच अशा बेजबाबदार लोकांना पडलेला असतो. मुलं ही राष्ट्रीय संपत्ती आहे ही नुसती तोंडी बोलण्याची गोष्ट नव्हे तर ते राष्ट्रीय कर्तव्यसुद्धा आहे याची जाणीवच आपल्याकडे नाही. अशा अनुवंशात किंवा परिवेशात वाढलेली मुलं पुढे जाऊन मानसिकदृष्ट्या निरोगी कशी राहतील? त्यांच्या स्वभावाला वेडेवाकडे कंगोरे पडतात. त्यांच्या मनावर ओरखडे उमटतात आणि त्यांचं मन मग छिन्नभिन्न होऊन जातं.

मन रे तू काहे न धीर धरे

जो निर्मोही मोह ना जाने उनका मोह करे

असं नॉर्मल माणसाचंही होतं. तर ज्यांच्या मनाची निरोगी वाढच झालेली नाही, ज्यांचं मनच मुळी रुग्णाईत आहे त्यांचं काय होईल?

प्रभुमध्ये मन राहो

मनी प्रभु घेवो ठावो

अशा संतांचं ठीक असतं. त्यांनी समजून उमजून आपला मनोलय करून टाकलेला असतो. पण ज्यांच्या बाबतीत त्यांच्या मनाचं आरोग्य त्यांच्या हातात नसतं, परमेश्वराचीच अवकृपा म्हणावी लागते त्यांचं मात्र कठीण असतं. तो प्रभू केव्हा आपल्याकडे लक्ष देईल, केव्हा आपल्यावर कृपा करेल याची वाट पाहत, वेड्यावाकड्या, काट्याने भरलेल्या मार्गावरून बिचारी ठेचाळत, धडपडत चालत असतात. रक्तबंबाळ होत असतात, मदतीची वाट पाहत असतात. ती नाही मिळाली तर मग असंच बेसूर आयुष्य त्यांच्या वाटणीला कायमचं येतं. दुर्विकारांनी केलेली ही दैना कधी संपणार? नाही माहीत.

-अॅड. अपर्णा परांजपे प्रभु

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article