मधुमेहामुळे डोळ्यांना होणाऱ्या उपद्रवामुळे अंधत्व येऊ देऊ नका
आज मधुमेह नियंत्रण दिन, त्यानिमित्त... मधुमेह हा अत्यंत गंभीर विकार आहे. त्याच्यामुळे अंधत्व, हृदयरोग, मूत्रपिंड पिडा, लकवा, गँगरीन यासारख्या भयानक रोगांना तोंड द्यावे लागते. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम, विशेष औषधोपचार यांच्या मदतीने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.महत्त्वाची बाब म्हणजे डोळ्यांना होणाऱ्या उपद्रवावर उपचार करून अंधत्व टाळता येते.
1) मधुमेहामुळे डोळ्यांना उपद्रव होतो म्हणजे काय?
मधुमेहाचे आनुवंशिक उपद्रव अनेक आहेत. डोळ्यांना होणाऱ्या उपद्रवामध्ये दृष्टीची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते. प्रसंगी अंधत्वही येऊ शकते. पुढील उपद्रव होण्याचीही शक्यता आहे.
- डायबेटिक रेटिनोपथी (डोळ्यातील स्नायूंच्या पडद्याला धोका)
- डोळ्यांतील रेटिनाच्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांवर मधुमेहाचा परिणाम होऊन इजा होण्याची शक्यता असते.
- मोतीबिंदू- नेत्रमण्याची पारदर्शकता कमी होऊन धूसर दिसते. दृष्टी कमी होऊन अंधत्व येते.
- काचबिंदू- डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्याने दृकचेतनी दबली जाते व दृष्टी मंदावू लागते. अंधूक दिसणे, अंधत्वाची शक्यता असते.
2) मधुमेहामुळे अनेक रुग्णात उद्भवू शकणारा उपद्रव कोणता?
डायबेटिक रेटिनोपथी- 10 ते 30 टक्के लोकांना अंधत्व येते, ते डायबेटिक रेटिनोपथीमुळे. रक्तवाहिन्यांतून रक्तस्राव होऊ लागतो, तो साठून सूज येते. रेटिनोपथीची वाढ झाली की अचानक नव्या रक्तवाहिन्या निर्माण होतात. अंधूक दिसते. तसेच रेटिना सुजून अंधत्व येऊ शकते.
धूसर-पुसट दिसणे- अगदी सुरुवातीला थोडासुद्धा दृष्टिदोष दिसत नाही. अंधूक व धूसर दिसणे हे त्रास नसतात. पण उपद्रव वाढत गेला की डोळ्यासमोर बिंदू दिसू लागतात. दृष्टी कमी होऊ लागते. ही सर्व क्रिया अत्यंत मंदगतीने होते. उशीर झाला की दृष्टी नाहीशी होते. निदान लवकर झाले तर लागलीच उपाययोजना करता येते, अंधत्वाचा धोका टाळता येतो. म्हणूनच डोळ्यापुढे डाग, बिंदू दिसू लागले, दृष्टी मंदावू लागली की ताबडतोब नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.
3) मॅक्युलर इडिमा (सूज येणे)
मध्यवर्ती दृष्टी क्षीण करणारा मॅक्युला नावाचा जो भाग असतो, त्याला रक्तवाहिन्यांतून होणाऱ्या रक्तस्रावामुळे सूज येते. याला मॅक्युलर इडिमा म्हणतात. हा उपद्रव सुरुवातीच्या काळातही उद्भवू शकतो. म्हणून तो धोकादायक असतो.
4) डायबेटिक रेटिनोपथीचा धोका सर्वात जास्त कोणाला?
मधुमेहाची सुरुवात झाल्यानंतर जर रुग्णांनी त्यावर नियंत्रण ठेवले तर आठ-दहा वर्षांनंतर हा धोका उद्भवण्याची शक्यता असते आणि नियंत्रण चांगले नसेल तर दोन-तीन वर्षातच हा धोका उद्भवू शकतो.
5) निदान पद्धत
डायबेटिक रेटिनोपथीचे निदान व्हिज्युअल अॅक्युसिटी टेस्ट किंवा व्हिजन टेस्टद्वारे करता येते. रुग्णाला वेगवेगळ्या अंतरावर किती स्पष्ट दिसते, यावरून त्याचे मापन होते. डायलेटेड आय एक्झामिनेशन याद्वारे डोळ्यातील बाहुली प्रसरण पावण्यासाठी विविध औषधांचे थेंब डोळ्यात घातले जातात. ठरावीक वेळेनंतर रेटिना व दृकचेतनी यांची तपासणी केली जाते. या थेंबाच्या परिणामामुळे काही तास जवळचे स्पष्ट दिसत नाही. प्रकाश जास्त व भगभगीत वाटतो.
ट्रोनोमेट्री- एका विशिष्ट साधनाच्या साहाय्याने डोळ्यातील द्रवाचा दाब मोजतात.
ऑप्टिक किहेनस टोमोग्राफी- डोळ्यांचे स्कॅनिंग करणे, डोळ्यांचे बाहेरील व आतील भाग, बुब्बुळ ते रेटिनापर्यंतचे सर्व भाग निरखून पाहिले जातात. रेटिना हा अनेक स्तरांचा असतो. प्रत्येक लेसर नीट तपासून पाहिल्याने उपाययोजना कोणत्या प्रकारची करायला हवी, हे ठरविता येते. एफएफए- हातातील रक्तवाहिनीतील विशिष्ट प्रकारचा रंगीत द्राव टोचला जातो. तो डोळ्यातील रक्तवाहिन्यांतून जाताना कोणत्या रक्तवाहिनीतून रक्तस्राव होतो, हे कळू शकते. त्याप्रमाणे नेत्रतज्ञ उपाययोजना ठरवतात.
6) मधुमेहामुळे उद्भवलेल्या रेटिनोपथीवर उपचार आहेत?
- ग्रीन लेसर पद्धतीने यावर उपचार करता येतात. मॅक्युलाच्या ज्या ठिकाणी रक्तस्राव होत असतो, त्या ठिकाणी नेत्रतज्ञ लेसर स्पॉटची योजना करतात. त्यामुळे रक्तस्रावाचा वेग कमी होऊन सूज उतरते. इतर उपाययोजना व पद्धती- अँटी व्हीईजीएफ इंजेक्शन, स्टीरॉईड इंजेक्शन व शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. ही इंजेक्शन डोळ्यातील द्रवात दिली जातात. सूज असलेल्या रुग्णात लेसर ट्रिटमेंट व इंजेक्शन यांचा एकत्रित वापर केला जातो. जर रेटिनोपथीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला असेल तरच शस्त्रक्रियेची गरज भासते.
7) मधुमेहामुळे होणारी रेटिनोपथी रोखता येते?
रेटिनोपथी पूर्णपणे रोखता येत नाही, पण तिला आवर घालता येतो. तिची मोठ्या प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली तर रेटिनोपथीची सुरुवात रोखता येते. पुढे ढकलली जाऊ शकते आणि लेसर ट्रिटमेंट वा शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते. रक्तदाब आणि कोलेस्टोरॉल नियंत्रणात ठेवल्यानेही रेटिनाला होणारा उपद्रव टाळता येतो. म्हणजेच मधुमेह, रक्तदाब, वजन आटोक्यात ठेवून त्यावर चांगले नियंत्रण ठेवल्यास रेटिनाला होणारे रोग रोखता येऊ शकतात.‘अर्ली ट्रिटमेंट डायबेटिक रेटिनोपथी स्टडी’ने सिद्ध केले आहे की,डोळ्यांची नियमित तपासणी आणि आवश्यक असल्यास ताबडतोब लेसर उपचार करून दृष्टी जाण्याचा गंभीर धोका टाळता येतो. म्हणूनच रुग्णांनी नेत्रतज्ञांना नियमित भेट देऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
8) मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे इतर रोग कोणते?
डोळ्यांना होणाऱ्या रोगांचा धोका इतरांपेक्षा मधुमेही रुग्णात अधिक असतो. विशेषत: मोतीबिंदू व काचबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. मोतीबिंदू शस्त्रक्रियेद्वारे दूर करता येतो व काचबिंदू औषधोपचार, लेसर ट्रिटमेंट वा शस्त्रक्रियेने बरा करता येतो.
9) आपल्या दृष्टीच्या सुरक्षिततेसाठी काय करावे?
आपल्या डोळ्यांना होणाऱ्या उपद्रवाची तपासणी करून सुरुवातीलाच निदान करून घेणे अत्यंत फायद्याचे ठरते. दृष्टी कमी होणे, अंधत्व येणे हे टाळण्यासाठी नियमित तपासणीसाठी नेत्रतज्ञांची भेट घ्यावी. वर्षातून एकदा ‘डायलेटेड आय एक्झामिनेशन’ तपासणी करून घ्यावी आणि आपल्या मधुमेहावर नियंत्रण ठेवावे.
- डॉ. कोडकणी आय सेंटर,अयोध्यानगर, कोल्हापूर क्रॉसजवळ, बेळगाव.मारुती गल्ली, महिला वस्तू भांडारच्या वर, बेळगाव.