दुखण्याकडे दुर्लक्ष नकोच नको...
छातीत दुखणे हा विकार आपल्या परिचयाचा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने कधीना कधी या विकारावर औषध घेतलेले असते. बहुतेकांची छातीदुखी घरगुती किंवा डॉक्टरांनी दिलेले औषध घेतल्यानंतर बरीही होते. म्हणून या विकाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पित्त झाल्याने छातीत दुखत असेल, असा विचार आपण करतो. तसेच ती बरी झाल्यावर आपण तिला विसरुन जातो.
तथापि, अशा दुखण्याकडे दुर्लक्ष करु नये, हे दाखवून देणारी घटना ब्रिटनमधील डर्बीशायर येथे वास्तव्यास असलेल्या लियाम हॅडली यांच्या संदर्भात घडली आहे. आज ते जिवंत नाहीत. पण त्यांच्या संदर्भात घडलेली ही घटना मात्र, अतिशय गंभीर आणि सर्वांना विचार करायला लावणारी अशीच आहे. बऱ्याच वर्षांपासून त्यांना छातीदुखीचा विकार होता. तो बराच कालावधी त्यांनी अंगावर काढला. प्रारंभीची काही वर्षे त्यांना थोडेसे दुखत असे. त्या वेदना सहन करता येण्यासारख्या असल्याने आणि थोड्या वेळाने कमीही होत असल्याने त्यांनी फारसा विचार केला नाही. नंतर वेदना असह्या होऊ लागल्या, तेव्हा ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सर्व परीक्षणे केल्यानंतर त्यांना औषध देऊन घरी पाठविले. औषधांवर त्यांनी आणखी काही महिने काढले. पण वेदना वाढतच होती. त्यामुळे त्यांना गंभीर विकार असावा काय, अशी शंका डॉक्टरांना आल्याने त्यांनी सर्वंकष परीक्षण केले. या परीक्षणातून हॅडली यांना फुप्फुसांचा असाध्य कर्करोग असल्याचे आढळले.
अखेर याच असाध्य विकाराने त्यांचा बळी घेतला. त्यांना या विकाराची लागण अनेक वर्षांपूर्वीच झाली होती. तथापि, त्यांनी आणि त्यांच्या डॉक्टरांनीही प्रारंभी दुर्लक्ष केल्याने तो विकार बळावला. प्रारंभीच उपचार झाले असते तर तो बराही झाला असता किंवा जीवघेणा ठरला नसता. पण प्रारंभीच्या दुर्लक्षामुळे त्याने गंभीर रुप धारण केले. त्यामुळे सावधानतेचा इशारा तज्ञांनी सर्वांनाच दिला आहे.