नायक वाल्मिकी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवू नका
वाल्मिकी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कर्नाटकातील नायक वाल्मिकी समाज विकासापासून दूर आहे. या समाजाचा आर्थिक व सामाजिक स्थैर्य वाढावा यासाठी त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण दिले होते. परंतु, याच प्रवर्गात आता इतर जातींनाही आरक्षण देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असून, याला नायक वाल्मिकी समाजाने आक्षेप घेत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून 50 जातींना आरक्षण दिले आहे. त्यामध्ये आता कुरबर समाजाचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. यामुळे अनुसूचित जमातींमधील आरक्षणाला धक्का पोहोचणार आहे.
त्यांचे अधिकार कमी होणार असल्याने त्यांना आरक्षणाचा कोणताच उपयोग होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने अनुसूचित जमाती प्रवर्गाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी युवा संघटना तसेच बेळगाव जिल्हा महर्षी वाल्मिकी नायक होराट समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिरस्तेदार शिवानंद यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर, राजशेखर तळवार, भावकाण्णा बंग्यागोळ, एस. एस. मुक्कन्नावर, सुशिला दड्डीकर यासह इतर उपस्थित होते.