मराठीतून शिक्षण घेतल्याचा न्यूनगंड नको
24 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
परीक्षार्थी व ज्ञानार्थी यामध्ये फरक आहे. परीक्षा फक्त गुणांपुरत्या असतात, परंतु आपण ज्ञानार्थी होणे आवश्यक आहे. ती समृद्धी वाढवा, वाचन करा आणि आपल्या कर्तृत्वावर यश मिळवा, असे उपदेशपर मत शिक्षक विश्वजित हसबे यांनी मांडले.
राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या सहकार्याने गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित 24 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. लोकमान्य रंगमंदिर येथे उभारलेल्या उद्योगरत्न रतन टाटा साहित्यनगरीमध्ये हे संमेलन झाले. संमेलनाचे उद्घाटन सीए आर. एन. हरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर तसेच सुभाष ओऊळकर, विक्रम पाटील, चंद्रकांत पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद मोळेराखी व स्वराली बिर्जे उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी ‘उठा उठा हो नवयुवकांनो, बलसागर भारत होवो’ ही गीते सादर केली. वर्षभरात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सुभाष ओऊळकर यांनी स्वागत करून संमेलनाला व प्रबोधिनीला अनेकांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इंद्रजित मोरे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी संमेलन घेत असल्याचे सांगितले. आर. एन. हरगुडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनपर भाषण
यावेळी हरगुडे म्हणाले, दृढनिश्चय, निर्णय व समर्पण या तीन गुणांच्या आधारे अशक्य ते शक्य करता येते. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतल्याचा न्यूनगंड बाळगू नये. कारण आज जगाचे नेतृत्व करणाऱ्या अनेक मंडळींनी मराठी भाषेतूनच शिक्षण घेतले होते.
अध्यक्षीय भाषण
विश्वजीत हसबे म्हणाले, ज्या प्रमाणे सूर्यापासून सूर्याची किरणे वेगळी करता येत नाहीत, त्याप्रमाणे शिक्षणापासून विद्यार्थ्याला दूर करणे अशक्य आहे. आजचे युग स्पर्धेचे आहे, तसेच ते संगणकाचे युग आहे. त्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी घ्यायला हवे. मात्र, त्याचा दुरुपयोग टाळायला हवा. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झाले पाहिजे.
संमेलनाचे व्यासपीठ तुमच्यासाठी खुले आहे. या माध्यमातून वाचन आणि लेखन संस्कृती जोपासा. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. परंतु ती पूर्वीपासूनच अभिजात आहे. तिचा अभिमान बाळगून व्यवहारात या भाषेचा उपयोग करा, असेही हसबे म्हणाले.
नाट्या सादरीकरण
साने गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर शिवराज चव्हाण दिग्दर्शित नाट्याप्रसंग सादर करण्यात आला. गुरुजींनी विठ्ठल मंदिर सर्व वंचितांसाठी कसे खुले केले व बंधुभाव जोपासला, याचे चित्रण या प्रसंगात होते. यानंतर संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ झाला. सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले. संस्कृती गुरव यांनी आभार मानले.