‘स्वस्त’च्या मागे लागू नका !
कोणतीही वस्तू स्वस्त मिळत असेल तर ती घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो, ही वस्तुस्थिती आहे. वस्तू फुकटात मिळत असेल तर उत्तमच, पण निदान स्वस्त तरी हवीच हवी, असा अनेकांचा खाक्याच असतो. तथापि, केवळ किंमतीकडे पाहून खरेदी केल्यास कशी फसगत होते, हे सध्या सोशल मिडियावर प्रसिद्ध होत असलेल्या एका स्वारस्यपूर्ण व्हिडीओतून दिसून येत आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर त्यांची मतेही व्यक्त केलेली आहेत.
प्रत्येकाला आपल्या मालकीचे घर असावे असे वाटतेच. ते कितीही लहान असो, पण तेथून आपल्याला कोणी ‘ऊठ’ असे म्हणू नये, ही प्रत्येकाची इच्छा असते. पण घरांच्या किमती इतक्या आहेत, की ही इच्छा पूर्ण होईलच असे नाही. एका व्यक्तीने केवळ स्वस्त मिळाले म्हणून एक मोठे घर खरेदी केले. 2 कोटी रुपये ज्या घराचा बाजारभाव आहे, ते घर त्याला केवळ 20 लाख रुपयांना मिळाले होते. त्याने या घरात वास्तव्याला प्रारंभ करताच, त्याला चित्रविचित्र अनुभव येऊ लागले. मध्यरात्री या घरातील सर्व दिवे अपोआप लागतात. इस्त्रीही अपोआप सुरु होते. घरातील पंखेही अपोआप फिरु लागतात. ते बंद केले तरी बंद होत नाहीत, असे या व्यक्तीचे म्हणणे आहे. केवळ स्वस्त मिळाले म्हणून हे घर घेऊन आपण पस्तावलो आहोत, असे हा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे. अनेकांचा या व्हिडीओवर विश्वास नाही. तो बनावट असावा असे कित्येकांचे मत आहे. काहीही असले तरी एक संदेश यातून मिळतोच. तो असा की, केवळ स्वस्ताईच्या मागे लागणे बरे नाही. स्वस्त वस्तू मस्त असतीलच असे नाही. चीनी मालाच्या खरेदीदारांनाही हा अनुभव बऱ्याचदा आलेला असतो. त्यामुळे केवळ किमतीकडे न पाहता गुणवत्तेला महत्व देणेही अंतिमत: लाभदायक असते.