For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोषारोप नकोत, आत्मपरीक्षण हवे

06:39 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोषारोप नकोत  आत्मपरीक्षण हवे
Advertisement

निवडणुका येतात जातात. जाताना नवनवीन धडा देऊन जातात. यंदाच्या निवडणुकीत गोव्यातील भाजपला मतदारांना गृहीत धरल्याचा आणि अतिआत्मविश्वास नडल्याचा धडा मिळाला. राजकारणाला धर्म लागत नाही मात्र काही धर्मांना राजकारण लागतेच, हे स्पष्टच झाले. एक धर्म जागृत मतदारांचा होता तर दुसरा धर्माची पर्वा न करता राजधर्म पाळणाऱ्या मतदारांचा होता. पहिल्याला राजधर्म लागत नाही. त्यांनी धर्मासाठीच देशभर एकजुट दाखविली तर दुसऱ्याने आपल्याला गृहीत न धरण्याचा इशाराच सत्ताधाऱ्यांना दिला. त्यामुळे एकगठ्ठा मतांना राजधर्म पाळणाऱ्या मतांचीही जोड मिळाली आणि गोव्यातले पन्नास टक्के यश काँग्रेसच्या पदरात पडले. ही तशी दक्षिण गोव्याची परंपराच आहे. नशीब श्रीपाद भाऊंचे त्यांच्या बालेकिल्ल्यात धर्माची चिंता वाहणारे एकगठ्ठा मतदार नाहीत. त्यामुळेच ते सहावेळा भाजपचे खासदार बनू शकले मात्र भाजपने एकगठ्ठा मतांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणेच उचित आहे.

Advertisement

दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा हे गोव्यातील केवळ दोन लोकसभा मतदारसंघ. केवळ दोन असले तरी या मतदारसंघांना दिल्लीत प्रतिष्ठा आहे. गोव्यात लोकसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीची परंपरा, मगो-युगो, काँग्रेस-मगो व भाजप-काँग्रेस यांनी कायम राखली आहे. अपवाद दक्षिणेत आणि उत्तरेतही घडलेले आहेत. ‘अब की बार चारसो पार’ करण्याचा विडा उचललेल्या भाजपने यंदा गोव्यात पुन्हा अपवाद घडविण्याची प्रतिज्ञाच केली होती. त्यासाठीच पल्लवी धेंपेंना मैदानात उतरविण्यात आले. तन-मन-धन ओतण्यात आले. नेते आणि कार्यकर्त्यांनी रात्रीचे दिवस केले. मात्र निभाव लागला नाही. आश्चर्य म्हणजे काँग्रेस पक्षाला गाजावाजा न करता यश आले. त्यांच्या प्रचारात सन्नाटाच होता. भूमिगत कार्यरत राहून मतांची बेगमी कशा पद्धतीने करता येते, याचा धडा काँग्रेसच्या आणि विशिष्ट समूहाच्या नेत्यांनी या निवडणुकीत घालून दिला. हा आता इतिहास झाला आहे. झोकून देऊनही अखेर भाजपला गोव्यात पन्नास टक्के यशावरच समाधान मानावे लागले, याची खंत मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांना लागलेली आहे. काँग्रेसला ही खंत नाही. त्यांनी पन्नास टक्क्यांवर आधीच पाणी सोडले होते. काँग्रेसचे सारे लक्ष द. गोव्याच्या जागेवरच होते. त्यामुळे काँग्रेसला दक्षिणेतले यशच शंभर टक्के यश वाटते. दक्षिण गोवा जिंकल्याच्या नादात त्यांना उत्तर गोव्यातील पराभवाची खंतच नाही.

Advertisement

लोकसभा निवडणुकीत गोव्यात काँग्रेसने काही कमावलेले नाही आणि भाजपनेही काही गमावलेले नाही. त्यांच्या जागा त्यांच्याकडेच आहेत. तरीही दक्षिणेतील पराभव भाजप नेत्यांच्या वर्मी लागला, यात संशय नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व खासदार सदानंद शेट तानावडे यांनी तर धर्मगुरुंवर तोफ डागली. राजकारणाला धर्म लागत नसला तरी काही धर्मांना राजकारण लागते, हे पुन्हा त्यांना कळून आले. तसे पाहता, दक्षिण गोव्यात काहीच आश्चर्य घडलेले नाही. दक्षिण गोव्याची ती परंपराच आहे. यंदा विरोधी पक्षांमध्ये युती झाल्याने विजयाच्या मार्गातील अडथळाही आधीच दूर झाला होता मात्र भाजपने आपल्या बहुसंख्य आमदारांच्या बळावर विजय प्राप्त करण्याची अपेक्षा ठेवली होती. तीच पूर्णतया फोल ठरली. भाजपचे बळ असलेल्या मतदारसंघातही काँग्रेसच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा जास्त मते का पडली, याचेच चिंतन भाजपने करावे. अल्पसंख्यांक मतदारांची भूमिका आणि त्यांच्या धर्मगुरुंचा हस्तक्षेप चव्हाट्यावर आणण्याची काहीच गरज नाही. भाजपनेही स्वामी आणि धर्मगुरु म्हणणाऱ्यांना गोंजारले होते, हे नाकारता येत नाही. परंतु एक वर्ग आपल्या धर्मगुरुंचा आदेश शिरोधार्य मानतो तर दुसरा वर्ग असा आहे जो, स्वामी आणि धर्माची पर्वा करीत नाही. तो आपल्याच कलाने वागतो. पहिल्या वर्गाने काँग्रेसला दक्षिणेत विजय मिळवून दिला तर दुसऱ्या वर्गाने भाजपला पराभूत करण्यासाठी हातभार लावला, असा याचा अर्थ निघतो मात्र अल्पसंख्यांक वर्गाला दोष देण्यात अर्थ नाही. त्यांनी आश्चर्य घडविलेले नाही किंवा पक्षपातही केलेला नाही. लोकशाहीत एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समूहाला कोणाला मत द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, याचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. भाजपच्या नेत्यांनी दोषारोप करण्यापेक्षा जनादेशाचा सन्मान करावा. लोकशाहीचा धर्म पाळावा, हेच उचित ठरेल. राजकीय चढाओढीच्या स्पर्धेत धेंपेंना थोडेसे अपमानीत व्हावे लागले. याची भरपाई भाजप वेगळ्या मार्गाने करू शकतो.

उत्तरेत रमाकांत खलप खूपच कमी पडले असे म्हणण्यापेक्षा ‘बळीचा बकरा’ ठरले, असेच म्हणावे लागेल. दक्षिणेतल्या पराभवामुळे श्रीपाद भाऊंचा ऐतिहासिक विजय भाजपला म्हणावा तसा साजरा करता आला नाही. त्यात केंद्रात भाजपने बहुमत गमावल्याची खंतही कुणाला लपवता येणे शक्य नव्हते. पुढील अडीच वर्षांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मागील निवडणुकीत विखुरलेल्या विरोधी पक्षांनी भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी दिली. विरोधकांची युती टिकली तर येणाऱ्या निवडणुकीत गोवा भाजपला धोका आहे. मगोची साथ सोडता येणार नाही. विरोधी पक्षांचे आमदार फोडाफोडीचे राजकारण भाजपच्या अंगलट येत आहे. हा प्रकार भाजपच्या सर्वसामान्य मतदारांनाही रुचलेला नाही. मनोहर पर्रीकरांनी गरज म्हणून असे प्रयोग पेले होते परंतु हल्ली भाजपने गरज नसतानाही फोडाफोडीचे प्रयोग केले. लोकसभा निवडणुकीत याचा लाभ काही झालाच नाही. भ्रष्टाचार, मनमानी, अहंकार, उधळपट्टी, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाचीही खंत जनतेच्या मनात आहे. काँग्रेसला उत्तर गोव्यात सक्षम संघटन उभे करावे लागेल. मतदार आहेत पण प्रभावी नेत्यांची काँग्रेसकडे कमतरता दिसून येते. गमावलेली विश्वासार्हताही कमवावी लागेल. आता लोकसभा निवडणुकांचा अध्याय संपलेला आहे. आता लक्ष्य असेल अडीच वर्षांनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे.

केंद्रात भाजपने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. श्रीपाद नाईकांना परंपरेने राज्यमंत्रिपद मिळालेले आहे. गोव्याचा तेवढाच सन्मान. श्रीपादभाऊंची ही अखेरची कारकीर्द आहे. ही कारकीर्द पूर्वीपेक्षा उजळून निघणार, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे राजकारणात नवखे आहेत. ते कधी पंचसदस्यही बनलेले नाहीत. तरीही त्यांनी थेट देशाच्या लोकसभेत झेप घेतलेली आहे. त्यांच्याकडूनही गोमंतकीयांना खूप अपेक्षा असणारंच. प्रचार काळात ते भारताच्या राज्यघटनेवर घसरले व वादात सापडले. भारतभूमीला माता मानणाऱ्या मतदारांनीही त्यांच्या या चुकीकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्या विजयाचे वाटेकरी बनले, हे सत्य आहे. गोव्याच्या खऱ्या प्रश्नांना तडीस लावण्यासाठी त्यांच्या खासदारकीचा उपयोग व्हायला हवा. मतदारांनी पल्लवी मॅडमना नाकारलेले नाही. भाजपला नाकारलेले आहे. मतदारांनी कॅप्टन विरियातो फर्नांडिसना स्वीकारलेले नाही. काँग्रेसला स्वीकारलेले आहे. दक्षिणेत उमेदवार कोणीही असता तरी चित्र हेच राहिले असते.

अनिलकुमार शिंदे

Advertisement
Tags :

.