राष्ट्रीय पक्षांसमोर लाचार होऊ नका
म. ए. समितीची सूचना : काळ्यादिनी निषेध मोर्चा काढण्याचा निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मागील 70 वर्षांपासून लढा देत आहे. इंग्रजांविरुद्ध दीडशे वर्ष लढा दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे यापुढेही एकजुटीने सीमाप्रश्नाचा लढा सुरूच ठेवला जाईल. परंतु म. ए. समितीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांने अथवा पदाधिकाऱ्यांने राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांसमोर पायघड्या घालू नयेत. बाबुराव ठाकुर, सुभाष जाधव यासारख्या मोठ्या नेत्यांनी कधीही सीमाप्रश्नाची प्रतारणा केली नाही. त्यांनाही राष्ट्रीय पक्षांकडून मोठ्या संधी दिल्या गेल्या असत्या परंतु ते कधीही लाचार झाले नाहीत, याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांने ठेवावे, अशी सूचना शहर म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आली.
शहर म. ए. समितीची बैठक रविवारी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे पार पडली. या बैठकीमध्ये 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून निषेध फेरी काढण्यासोबतच कर्नाटक विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेण्याचा निर्धार करण्यात आला. व्यासपीठावर शहर म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील, नेताजी जाधव उपस्थित होते. म. ए. समितीच्या आंदोलनामध्ये आडकाठी घालण्याचे प्रकार प्रशासनाकडून दरवेळी केले जातात. परंतु परवानगी मिळो अथवा न मिळो 1 नोव्हेंबर रोजी काळादिन मूक सायकल फेरी काढणारच असा निर्धार बैठकीत करण्यात आला.
तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज
काळादिन पाळण्यासंदर्भात म. ए. समितीकडून विभागवार जागृती केली जात आहे. परंतु प्रशासनाकडून तरुण कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याने म. ए. समितीने अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची मागणी करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, अॅड. अमर येळ्ळूरकर, सागर पाटील, रणजीत हावळाण्णाचे, श्रीकांत कदम, शिवराज पाटील, सचिन केळवेकर, प्रकाश नेसरकर, श्रीकांत मांडेकर, संतोष कृष्णाचे, साईनाथ शिरोडकर, उमेश पाटील, आकाश भेकणे, बाबू कोले, अनिल अमरोळे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार जगदीश शेट्टर यांच्या वक्तव्याचा निषेध
मराठी मतांवर निवडून आलेले खासदार जगदीश शेट्टर यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच सीमालढ्यावर तोंडसुख घेतले. काळादिन करायचा असेल तर तो महाराष्ट्रात जाऊन करा, असा अनाहुत सल्लाही खासदार जगदीश शेट्टर यांनी दिला होता. या वक्तव्याचा शहर म. ए. समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.