मुस्लिमांची दिशाभूल करू नका!
फरार जाकिर नाईकच्या पोस्टला केंद्रीय मंत्र्यांचे प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फरार धार्मिक उपदेशक झाकिर नाईककडून करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टवर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारतातील मुस्लिमांची दिशाभूल करू नका. देशाच्या लोकांना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार असल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे. यापूर्वी झाकिरने भारतातील मुस्लिमांना ‘वक्फच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे’ आणि ‘वक्फ दुरुस्ती विधेयक नाकारण्याचे’ आवाहन सोशल मीडिया पोस्टद्वारे केले होते.
भारतीय वक्फ संपत्तींना वाचवा, वक्फ दुरुस्ती विधेयक नाकारा, आम्ही सर्वांनी मिळून वक्फच्या पावित्र्याचे रक्षण करूया आणि आगामी पिढ्यांसाठी तो वाचविण्याच्या दिशेने वाटचाल करुया असे झाकिरने रविवारी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले होते. तसेच झाकिरने स्वत:च्या पोस्टद्वारे भारतीय मुस्लिमांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता.
रिजिजूंचे प्रत्युत्तर
झाकिर नाईकच्या चिथावणीला अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृपया आमच्या देशातील निर्दोष मुस्लिमांची दिशाभूल करू नका. भारत एक लोकशाहीवादी देश आहे. येथे लोकांना स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. खोट्या प्रचाराने केवळ खोटे दावे करणारी वक्तव्ये होतील असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
वक्फ कायदा मुस्लीम समुदायाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन आणि नियमनासाठी तयार करण्यात आला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश वक्फ संपत्तींचे योग्य संरक्षण आणि व्यवस्थापन सुनिश्चित करणे आहे. प्रत्येक राज्यात एक वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. हा बोर्ड वक्फ संपत्तींची नोंदणी, संरक्षण आणि व्यवस्थापन करतो. कायद्यानुसार सर्व वक्फ संपत्तींची नोंदणी अनिवार्य आहे. तर केंद्र सरकारने वक्फ कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक संसदेत मांडले होते. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर विचाराधीन आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संमत होण्याची शक्यता आहे.