काँग्रेसची मतपेढी होऊ नका!
केंद्रीय मंत्री रिजिजू यांचा मुस्लिमांना सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. लोकांनी काँग्रेसच्या असत्याला बळी पडू नये. काँग्रेस पक्षाने नेहमीच हिंदूंना विभागण्याचे आणि मुस्लिमांना खूश करण्याचे काम केले आहे. काँग्रेस नेहमीच मुस्लिमांना मतपेढीच्या स्वरुपात वापरले असल्याचा आरोप रिजिजू यांनी केला.
काँग्रेस मुस्लिमांना स्वत:ची मतपेढी मानते, निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्ष आपली 15 टक्के मुस्लीम मते सुरक्षित असल्याचे सांगते. यातून पक्षाची मानसिकता दिसून येते आणि हे मुस्लिमांसाठी मोठे नुकसान देखील आहे. मुस्लिमांची मतपेढी कायम राखून हिंदूंमध्ये फूट पाडणे हाच काँग्रेसचा मूळ प्लॅन असल्याचा दावा रिजिजू यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्यासारख्या व्यक्ती विरोधी पक्षनेता असणे देशासाठी जणू शापच आहे. कारण राहुल गांधी यांनी राज्यघटनेच्या मूळ भावनांना कधीच वाचले नाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राहुल गांधी यांच्या कुटुंबाने नेहमीच अपमान केला आहे. काँग्रेसने 60 वर्षांपर्यंत ईशान्येतील राज्यांकडे दुर्लक्ष केले. जगभरात सर्वाधिक उग्रवादी संघटना ईशान्येत आहेत आणि पूर्वी त्यांचे म्हणणे कुणीच ऐकत नव्हते. परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून 10 हजारांहून अधिक उग्रवाद्यांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवली आहेत आणि मुख्य प्रवाहात सामील होण्याचे पाऊल उचलले आहे. मणिपूरची एक घटना सोडल्यास पूर्ण ईशान्य शांतिपूर्ण असून लवकरच विकासाप्रकरणी देशाच्या उर्वरित राज्यांसोबत हे क्षेत्र येणार असल्याचा दावा रिजिजू यांनी केला.
राहुल गांधी यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसीच्या लोकांच्या समस्या आणि मुद्द्यांविषयी काहीच ज्ञान नाही. तरीही ते प्रत्येकवेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींबद्दल बोलत असतात. त्यांना अशाप्रकारे बोलण्याचे धडे देण्यात आले आहेत असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने मागील 60 वर्षांमध्ये मुस्लिमांना केवळ गरीबी दिली आहे. तर पंतप्रधान मोदी हे मुस्लिमांसाठी बँक खाती उघडतात, त्यांच्यासाठी घर निर्माण करत आहेत. पाणी, वीज अन् कर्जाची सुविधा देत आहेत. मोदी हे सर्व भारतीयांसोबत समान स्वरुपात वागत आहेत. केंद्राच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळतो. मग सर्व मुस्लीम मते काँग्रेसलाच का मिळावीत असे प्रश्नार्थक विधान रिजिजू यांनी केले आहे.
काँग्रेसने मुस्लिमांना मतपेढीचे स्वरुप देऊ नये. अल्पसंख्याकांची मते काँग्रेसला मिळणार नाहीत हे यावेळी आम्ही सुनिश्चित करणार आहोत. आम्ही स्पष्ट संदेश घेऊन लोकांकडे जाऊ असे रिजिजू म्हणाले.