नका मागू कुणा काही
अध्याय दहावा
बाप्पा म्हणाले, स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने जो माझी भक्ती करेल त्याला तो प्राप्त होईल पण निरपेक्षतेने माझी भक्ती करणे हे कठीण काम आहे. जे माझ्यावरील प्रेमापोटी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर माझेही प्रेम असते. भक्तांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर असतो. मी सर्वश्रेष्ठ दाता असल्याने भक्ताची मागणी माझ्या दातृत्वापुढे अगदीच किरकोळ असते. भक्ताने त्याच्या प्रपंचातील मागण्या मी पूर्ण कराव्यात अशी इच्छा केल्यास, त्रिभुवनाचं राज्य द्यायला मी तयार असताना त्याने माझ्याकडे केरसुणी मागितल्यासारखं होतं व आपलं कल्याण करून घेण्याची संधी तो गमावून बसतो.
बाप्पांचे सांगणे लक्षात घेऊन असं म्हणता येईल की, देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठी देवभक्ती करण्याला सुरवात करण्यापासून, देवा तुझ्याकडून मला काहीही नको असे म्हणण्यापर्यंत मजल जाणे हा देवभक्तीचा कळस होय. देव सर्वांकडे लक्ष पुरवत असतो हेही खरे पण त्याचे खरे प्रेम त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या भक्तांवर असते हेही तितकेच खरे! त्यांच्या अडीअडचणीच्यावेळी देव आपणहून धावत जातात. असे निरपेक्ष भक्त संख्येने फार कमी असतात. कमी म्हणजे किती कमी तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच! पुढील श्लोकात बाप्पा बहुतांशी लोकांच्या स्वत:बद्दल कोणत्या कल्पना असतात ते सांगत आहेत
विमूढा मोहजालेन बद्धाऽ स्वेन च कर्मणा । अहं हन्ता अहं कर्ता अहं भोत्तेति वादिनऽ ।। 16 ।।
अहमेवेश्वरऽ शास्ता अहं वेत्ता अहं सुखी ।
एतादृशी मतिर्नऽणामधऽ पातयतीह तान् ।। 17।।
अर्थ- मोहजालाने मोहित झालेले, स्वत:च्या कर्माने बद्ध झालेले, मी मारणारा-मी कर्म करणारा व फल भोगणारा असे म्हणणारे, मीच ईश्वर आहे, शास्ता आहे, ज्ञानी आहे, सुखी आहे असे समजणाऱ्या लोकांना त्यांची बुद्धि रसातळाला पोहोचवते.
विवरण- आपण कर्ते नसून ईश्वर आपले कर्ते करविते आहेत हे मायेच्या प्रभावाखाली असल्याने बहुतांशी मंडळींना मान्य नसते. त्यामुळे त्यांचे मनात स्वत:विषयी दृढ गैरसमज असतात. इतके की, मीच ईश्वर आहे असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते. हा स्वत:विषयी असलेला गैरसमज ह्या मूर्खांच्या नाशास कारणीभूत होतो. म्हणून पुढील श्लोकात बाप्पा वरेण्याला सांगतायत की, असं वागायचं सोडून दैवी गुण अंगी बाणवून नि:शंक होऊन माझी भक्ती कर.
तस्मादेतत्समुत्सृज्य दैवीं प्रकृतिमाश्रय ।
भक्तिं कुरु मदीयां त्वमनिशं दृढचेतसा ।। 18।।
अर्थ- म्हणून अशी स्वत:बद्दलच्या गैरसमजाला खतपाणी घालणारी बुद्धि सर्वथा टाकून देऊन दैवी प्रकृतीचा आश्रय कर आणि दृढ अंत:करणाने माझी भक्ति कर.
विवरण- ईश्वर प्राप्तीसाठी प्रेमयुक्त भक्तीची आवश्यकता असते. बेगडी प्रेम करणारे म्हणजे आपलं काम साधण्यापूरते प्रेम करणारे समाजात पुष्कळ आढळतात. स्वार्थ साधला की, त्यांचं प्रेम संपुष्टात येतं पण भक्तीत निरपेक्ष प्रेम करण्याची गरज असते. बाप्पा म्हणतायत दैवी स्वभावाच्या माणसाला सर्वत्र ईश्वराचं अस्तित्व जाणवत असतं. श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नका मागू कुणा काही हे त्याचे ब्रीद असते, त्यामुळे त्याला कुणाकडून काहीच नको असतं. अगदी देवाकडूनसुद्धा !! त्यामुळे त्याच्या मनात स्वार्थाचा लवलेशही नसतो. उलटपक्षी सर्वांच्यात दिसत असलेल्या ईश्वराच्या अस्तित्वामुळे तो सर्वांवर निरतिशय प्रेम करत असतो. असं सर्वांच्यावर निरपेक्षपणे, निरतिशय प्रेम करणं हा भक्तीचा सर्वोच्च प्रकार आहे. अशी भक्ती फार दुर्लभ असल्याने, अशी भक्ती करणारा हो असं बाप्पा वरेण्याला सांगत आहेत.
क्रमश: