कोणत्याही त्रुटींना थारा देऊ नका!
जिल्हाधिकाऱ्यांची सक्त सूचना : अधिवेशन तयारीचा घेतला आढावा18
प्रतिनिधी/ बेळगाव
8 डिसेंबरपासून होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या व उपसमित्यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार आदींसाठी निवास, जेवणखाण व वाहतूक व्यवस्थेची चोखपणे अंमलबजावणी करावी, कोणत्याही प्रकारच्या त्रुटींना थारा देऊ नये, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली.
बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी सुवर्णविधानसौधमध्ये अधिवेशन पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. अधिवेशनासाठी नियोजित करण्यात आलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहतुकीची व्यवस्था करावी. अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णविधानसौधच्या मुख्य द्वारापासून विधानसौधपर्यंत ने-आण करण्यासाठी मिनी बसची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
अधिवेशनासाठी येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आदींच्या निवास, जेवणखाण आदींची व्यवस्था करावी. अधिवेशनकाळात सुवर्णविधानसौधमध्ये मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी जेवणाच्या स्वतंत्र काऊंटरची व्यवस्था करावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी सतत संपर्कात रहावे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही कोणत्याही त्रुटींना थारा
मिळू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिवेशन पाहण्यासाठी येणाऱ्या शाळकरी मुलांविषयी आधीच माहिती मिळवावी. परजिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती त्या-त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिळविण्याची सूचना केली. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सुरक्षा व्यवस्था व पास वितरणासंबंधीची माहिती दिली.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जैन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदींसह विविध समित्या व उपसमित्यांचे प्रमुख उपस्थित होते.