गाढवांची मजाच मजा...
मध्यप्रदेशातील मंदसौर या जिल्ह्यात सध्या गर्दभ प्रजातीची (शुद्ध मराठीत गाढवांची) मजाच मजा चाललेली आहे. दिसेल त्या गाढवाला तेथील लोक चक्क पोटभर गुलाबजामुन खाऊ घालत आहेत. या कार्यक्रमांचे व्हिडीओही भलतेच लोकप्रिय होताना दिसतात. अशी गाढवांची चैन का चालली आहे, याचे कारण एका मजेशीर प्रथेत दडले आहे. ही प्रथा या भागात जुन्या काळापासून आहे.
या भागात पाऊस कमी पडतो. कित्येकदा दुष्काळाची स्थिती असते. पण मध्येच कोणत्यातरी वर्षी मॉन्सूनचा पाऊस जोरदार पडतो. त्या आनंदाप्रीत्यर्थ येथे गाढवांना गुलाबजामून खाऊ घातले जातात. गेली काही वर्षे मंदसौर भागात पावसाने बरीच ओढ दिली होती. पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनांवर विपरीत परिणाम होऊन शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र, यंदा भारतभर समाधानकारक पाऊस पडत आहे. अशीच स्थिती मध्यप्रदेशातही सर्वत्र आहे. मंदसौर जिल्ह्यावरही यंदा वरुणदेवतेने कृपा केली आहे. सरासरीपेक्षा जास्त वृष्टी होत आहे. यामुळे येथील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरीकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना तेथील जुन्या प्रथेची आठवण झाली असून ते गाढवांना गुलाबजामून खाऊ घालीत आहे. अक्षरश: ताट ताट भर गुलाबजामून गाढवांसमोर ठेवले जात असून गाढवेही या प्रेमामुळे भारावलेली आहेत. ती ही गुलाबजामून मेजवानी येथेच्छ झोडत आहेत. त्यांना गुलाबजामून खाऊ घालण्यात अर्थातच महिला आघाडीवर आहेत. गुलाबजामून तयार करणाऱ्यांचा धंदाही जोरात आहे. आता गाढवांनाच गुलाबजामून का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यासाठी याच भागातील आणखी एक प्रथा कारणीभूत आहे. पावसाने ओढ दिल्यास गाढवांना नांगराला जुंपून शेत नांगरले जाते. असे केल्याने पाऊस पडतो, अशी समजूत आहे. पाऊस पडला तर तो गाढवांमुळे पडल्याने नंतर गाढवांना गुलाबजामून खाऊ घालून त्यांच्या उपकारांची अशी परतफेड केली जाते.