आदमापूर शाळेस तृतीयपंथी पांडुरंग गुरव यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी
सरवडे प्रतिनिधी
जोगवा मागून साठवलेले एक लाख रुपये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला दान देण्याचे सत्कार्य तृतीय पंथी पांडुरंग गुरव या देवमामांनी केले आहे. आपल्या आयुष्यात जमवलेली मोठी रक्कम त्यांनी क्षेत्र आदमापूर येथील विद्या मंदिरला सुपूर्द केली आहे. शिक्षणासाठी त्यांनी दाखवलेले दातृत्व आदर्शवत असुन याबाबत त्यांचे कौतुक होत आहे.
चंदगड तालुक्यातील आसगोळी गावचे पांडुरंग गुरव हे देवीचे भक्त. अनेक वर्षांपासून ते जोगवा मागून आपला उदरनिर्वाह करतात.आदमापूर येथे आल्यानंतर त्यांना शाळेच्या इमारतीचे काम अपुरे दिसले. त्यांनी आपल्याकडील एक लाख रुपये शाळेला देणगी दिली. अनेक ठिकाणी फिरुन जमवलेले एक लाख रुपये त्यांनी शैक्षणिक कामासाठी दान केले. त्यांनी दाखवलेल्या दातृत्वाचे कौतुक असून यापुर्वीही त्यांनी शाळांना व मंदिरांना देणग्या दिल्या आहेत.शाळेला एक लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लोकांकडून मिळालेले पैसे सत्कारणी लागावेत यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेस मदत केली असल्याच गुरव यांनी सांगितले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धनाजी पाटील, मुख्याध्यापक डी. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, एस.डी.खतकर, एस.के.पाटील, तानाजी पाटील उपस्थित होते.