बोधगया येथील बौद्धविहार बुद्धिस्ट सोसायटीकडे द्या
बेळगाव : बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे गैरबौद्धांच्या हातात देण्यात आले आहे. तो बुद्धविहार इतरांच्या हातातून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेकडे द्यावा, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून बौद्ध समाज बांधवांनी आपल्या मागण्या मांडल्या. बोधगयासोबतच महू येथील जन्मभूमी स्मारक, नागपूर येथील दीक्षाभूमी देखील बुद्धिस्ट सोसायटीकडे सोपविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकरवी बिहारचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या महू येथे भव्य स्मारक तयार करण्यात आले आहे. परंतु, या ठिकाणी जयभीम ऐवजी इतर घोषणा दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी या महत्त्वाच्या संस्था बुद्धिस्ट सोसायटीकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली. शिरस्तेदार शिवानंद यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मल्लेश कुरंगी, मल्लेश चौगुले, यमनाप्पा गडीनाईक, कल्लाप्पा चौगुले, राजेंद्र कांबळे यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.