दूधात रक्त मिसळून पिणारा समुदाय
जगातील सर्वात उंच लोक
जगातील विविध देश आणि संस्कृतींमध्ये खानपानाच्या भिन्नभिन्न परंपरा आहेत. काही ठिकाणी दूधाद्वारे अनेक गोष्टी तयार केल्या जातात. तर काही ठिकाणी मांस हे भोजनातील महत्त्वाचा हिस्सा असते. शाकाहार आणि मांसाहारावरून चर्चा तर झडतच असते. सर्वसाधारणपणे खाद्यसवयी या भौगोलिक स्थितींवर निर्भर असतात. परंतु आफ्रिकेतील एक समुदाय हा दूधात प्राण्याचे रक्त मिसळवून पित असतो आणि याचद्वारे पाहुण्यांचे स्वागतही करतो.
दूधात रक्त मिसळून पिण्यासारखी अजब खाद्यसवय असलेल्या समुदायाचे नाव मसाई आहे. हा समुदाय मुख्यत्वे दक्षिण केनिया, उत्तर टांझानिया, इथियोपियामध्ये आढळून येतो. हा एक नीलोटिक समूह आहे. मसाई समुदायाच्या लोकांचे जीवन बऱ्याचअंशी प्राण्यांवर निर्भर असते. शेकडोंच्या संख्येत गायी पाळल्या जातात.
मसाई समुदायाच्या पारंपरिक आहारत मांस, रक्त, दूध, फॅट, मध आणि झाडाची साल महत्त्वाची असते. ते ताजे दूधही पितात, तर कधीकधी यात प्राण्यांचे रक्तही मिसळत असतात. दूधात रक्त मिसळून ते पिणे सर्वसाधारणपणे धार्मिक परंपरांदरम्यान केले जाते. तसेच मसाई लोक आजारी पडल्यावर हा प्रकार केला जतो. रक्त मिळविण्यासाठी हे लोक गुरांच्या गळ्याची नस कापत असतात.
आफ्रिकेच्या मसाई समुदायाचे लोक जगातील सर्वात उंच लोकांपैकी आहेत. मसाई समुदायाच्या लोकांची सरासरी उंची 6.25 फूट असते. उंचीत त्यांची बरोबरी केवळ त्सुसी समुदायाचे लोकच करू शकतात.
मसाई समुदायाचे लोक एकेश्वरवादी असून एन्गई नावाच्या देवतेची पूजा करतात. मसाई समुदायाच्या एन्गई देवतेची दोन रुप असून यात एन्गई नारोक आणि एन्गई ना न्योकी सामील आहे. एन्गई नारोक हिरवेगार गवत अन् समृद्धी आणते, तर एन्गई ना न्योकी दुष्काळ अन् उपासमार आणते. परंतु आता मोठ्या संख्येत मसाई लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.