डोनाल्ड ट्रंप स्थापन करणार ‘योद्धा मंडळ’
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेत ‘योद्धा मंडळ’ (वॉरियर्स बोर्ड) स्थापन करण्याची योजना सज्ज केली आहे. या मंडळात जाणत्या आणि निवृत्त सेनाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार असून या मंडळाच्या माध्यमातून अमेरिकेच्या संरक्षण विभागाची पुनर्रचना केली जाणार आहे.
सध्या अमेरिकेच्या सेनादलांमध्ये उच्च पदांवर असणाऱ्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती नारळ देण्याची ट्रंप यांची योजना आहे. ती लागू करण्यासाठी हे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या मंडळाकडे सध्या पदांवर असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे आणि त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याचे उत्तरदायित्व दिले जाणार आहे. हे मंडळ ट्रंप यांचा अध्यक्षपदी शपथविधी झाल्यानंतर त्वरित आपला अहवाल सादर करणार असून त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागात आणि संरक्षण रचनेत अमूलाग्र परिवर्तन केले जाण्याची शक्यता आहे. या पुनर्रचनेचे व्यापक परिणाम केवळ अमेरिकेसंदर्भातच नव्हे, तर अन्य देशांवरही होणार आहेत. विशेषत: संरक्षणासंदर्भात अमेरिकेवर अवलंबून असणाऱ्या देशांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हे देश या योजनेकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
पेंटागॉनवरही परिणाम होणार
सेनेतील सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची पदे भरण्याची पेंटागॉन या अमेरिकेतील संरक्षण प्राधिकारणाची पारंपरिक पद्धत आहे. ही पद्धती मोडीत काढली जाण्याची शक्यता आहे. तिच्या स्थानी ट्रंप प्रशासन अनेक नवे नियम आणि प्रक्रिया लागू करण्याची शक्यता आहे. याकामी हे योद्धा मंडळ साहाय्यभूत ठरणार आहे.
मागच्या प्रशासनाचा प्रभाव पुसणार
जोसेफ बायडेन यांच्या काळातील प्रशासनाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात पुसून टाकण्याची ट्रंप यांची योजना आहे. शिक्षणापासून संरक्षणापर्यंत आणि आरोग्यसेवेपासून उद्योगक्षेत्रापर्यंत, इतकेच नव्हे, तर न्यायक्षेत्रातपर्यंतही हा प्रभाव पुसण्यासाठी सज्जता करण्यात येत असून प्रस्तावित योद्धा मंडळ याच व्यापक योजनेचा एक भाग आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.