डोनाल्ड ट्रम्प यांचा आता द.आफ्रिकन अध्यक्षांशी वादंग
रामाफोसा यांच्यावर नरसंहाराचा आरोप : व्हाईट हाऊसमध्ये वाद-विवाद
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली. याप्रसंगी ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील वादातील सर्वात गुंतागुंतीच्या गोऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूवर चर्चा केली. याप्रसंगी ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर गोऱ्या शेतकऱ्यांच्या नरसंहाराचा आरोप केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वादंग झाला. हा आरोप निराधार असल्याचा दावा रामाफोसा यांनी केला. यापूर्वी ट्रम्प यांचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये कॅमेऱ्यासमोर मोठा वाद झाला होता. या वादानंतर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा दौरा अर्धवट टाकला होता.
संभाषणादरम्यान ट्रम्प यांनी रामाफोसा यांना एक व्हिडिओ दाखवला. यामध्ये गोऱ्या लोकांच्या नरसंहाराचे भीषण चित्र दाखवल्याचा दावा करण्यात आला होता. व्हिडिओ चालू असताना रामाफोसा गंभीर झाले. व्हिडिओमध्ये कित्येक गोऱ्या शेतकऱ्यांच्या हत्या होत असल्याचे दाखविण्यात आले होते. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गोऱ्या शेतकऱ्यांकडून जमीन बळकावल्याचा आणि द्वेषपूर्ण भाषणबाजी आणि सरकारी कारवाईद्वारे गोऱ्या जमीन मालकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही केला. अलिकडच्या काळात ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेच्या जमीन सुधारणा कायद्यावर टीका केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेत अल्पसंख्याक गोऱ्या लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला होता. तथापि, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला आर्थिक मदत थांबवण्याचा कार्यकारी आदेशही जारी केला होता.