For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॉर्न स्टार प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी

06:24 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पॉर्न स्टार प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी
Advertisement

11 जुलै रोजी शिक्षा सुनावणार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले आहे. अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान न्यूयॉर्कमध्ये जवळपास सहा आठवडे चाललेल्या खटल्यात त्यांना सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले. आता 11 जुलै रोजी त्यांना शिक्षा सुनावली जाणार असल्याचे न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केले आहे.

Advertisement

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान किंवा माजी राष्ट्राध्यक्षाविऊद्ध फौजदारी खटला चालवून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा प्रचार करणाऱ्या टीमने ‘कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही’ असे म्हणत न्यायालयीन निर्णयाचे स्वागत केले.

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला शांत ठेवण्यासाठी पैसे दिल्याबद्दल आणि निवडणूक प्रचारादरम्यान व्यावसायिक रेकॉर्ड बदलल्याबद्दल ट्रम्प यांच्याविऊद्ध खटले प्रलंबित होते. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने 6 आठवड्यात 22 साक्षीदारांची सुनावणी घेतली. यामध्ये स्टॉर्मी डॅनियल्सचाही समावेश होता. दोन दिवस विचारविनिमय केल्यानंतर 12 सदस्यीय ज्युरीने ट्रम्प यांना दोषी ठरवण्याचा निर्णय जाहीर केला. ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी कोर्टरूममधील वातावरण खूपच गंभीर होते. निकाल देण्यासाठी ज्युरीला कोर्टरूमच्या ज्युरी बॉक्समध्ये बोलावण्यात आले. याप्रसंगी ज्युरींनी आरोपी ‘दोषी’ असल्याचे जाहीर करताच डोनाल्ड ट्रम्प यांनी डोळे मिटत मान हलवली. ट्रम्प यांना दोषी जाहीर करण्याचा निकाल केवळ दोन मिनिटात ऐकवण्यात आला. आता त्यांना कोणती शिक्षा होणार यावर आता 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

नेमके प्रकरण काय?

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला काही बोलू नये म्हणून पैसे दिल्याचे तसेच या खटल्यात पेमेंट करण्यासाठी व्यवसायात खोट्या नोंदी केल्याचा आरोप आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने आपले डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लैंगिक संबंध होते, असा आरोप केला होता. या प्रकरणाबद्दल गप्प राहण्यासाठी स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प यांच्याकडून 1,30,000 डॉलर्स मिळाले होते. ही रक्कम ट्रम्प यांच्या माजी वकिलाने 2016 च्या निवडणुकीपूर्वी दिली होती, असा आरोप होता. या वकिलाचे नाव मायकल कोहेन असे असून त्यांना नंतर विविध आरोपांखाली तुऊंगवास झाला होता. हे आरोप 2018 मध्ये उजेडात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सबरोबर कोणत्याही प्रकारचा लैंगिक संबंध ठेवल्याचे आरोप फेटाळले होते.

Advertisement
Tags :

.