धर्मांतर, जादूटोणाप्रकरणी डॉम्निकला पुन्हा अटक
फाईव्ह पिलर चर्चवर दुपारी पोलिसांचा छापा : हृदयात दुखू लागल्याने डॉम्निक इस्पितळात
म्हापसा : फसवणूक आणि बेकायदेशीर धर्मांतरण, जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली सडये शिवोलीमधील बिलिव्हर्सच्या डॉम्निक डिसोझा व जॉन मास्करेन्हस यांच्यावर गुन्हा नोंदवून म्हापसा पोलिसांनी डॉम्निक यास अटक केली आहे. फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले तसेच प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखविले, असे कथित आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. हा डॉम्निक विऊद्धचा तिसरा गुन्हा असून त्याच्या पत्नी विऊद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवोली फाईव्ह पिलर चर्चचे पास्टर डॉम्निक विऊद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यावर प्रसार माध्यमानी म्हापसा पोलीस स्थानकात धाव घेतली. मात्र डॉम्निकने आपल्या हृदयात दुखत असल्याचा बहाणा करून म्हापसा जिल्हा आझिलोच्या पोलीस कोठडीत राहणे पसंत केले.
फाईव्ह पिलर चर्चवर छापा सत्र
दुपारच्या सत्रात पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सीताकांत नायक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पाटील, हवालदार सुशांत चोपडेकर यांनी कडक पोलीस बंदोबस्तात फाईव्ह पिलरमध्ये प्रवेश केला व सर्व जागेची पडताळणी करीत येथील भागाची चौकशी केली. यावेळी फॉरेन्सिक अधिकारी वर्गाचाही वापर करण्यात आला. जादूटोण्याबाबतही येथे तपास करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
त्या सर्वांवर गुन्हे नोंदविणार
उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले की, पोलीस स्थानकात रितसर धर्मांतर व जादूटोण्याची तक्रार मिळाल्यानंतर कायद्याच्या आधारे डॉम्निक विरोधात गुन्हा नोंद करीत त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत कसून चौकशी सुरू आहे. यापूर्वी धर्मांतराच्या 3 तक्रारी असून गुह्याच्या 9 तक्रारी पोलीस स्थानकात नोंद आहेत. या गुह्यात अन्य कोण कोण गुंतलेले आहेत त्यांची चौकशी व पडताळणी करून त्या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
पंचनाम्यात तक्रारदाराचीही उपस्थिती
फाईव्ह पिलरमध्ये धर्मांतर व जादूटोण्याची तक्रार देणारा पंचनामा करतेवेळीही पोलिसांसह घटनास्थळी उपस्थित राहून कशाप्रकारे जादूटोणा, कसे धर्मांतर करण्यास धमकी दिली, होली पाणी देऊन धर्मांतर करण्यास सांगितले याची सर्व माहिती पोलिसांना दिली. फाईव्ह पिलर चर्चमध्ये चर्चच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचीही झडती घेऊन नंतर एक एक करीत अधिकाऱ्यांना आतमध्ये पाठविले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निरीक्षक सीताकांत नायक व उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी आम्ही कायद्यानुसार येथे पंचनामा करण्यास आलो आहोत. येथे कुणीही पोलीस कामात अडथळा आणू नये, असे जिवबा दळवी यांनी आयोजकांना सांगितले.