पारंपरिक जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे वर्चस्व कायम राहील : प्रज्ञानंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने म्हटले आहे की, पुढील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणाऱ्या चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूरच्या आगमनानंतरही पारंपरिक जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे वर्चस्व कायम राहील. चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूर 2027 पासून वार्षिक स्पर्धा म्हणून आयोजित केली जाईल, ज्यामागचा उद्देश तीनही प्रकारांतील (फास्ट क्लासिक, रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ) विजेता निश्चित करणे हा आहे, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा क्लासिकल स्वरुपात खेळली जाते.
खरे सांगायचे तर, मी नियमावली नीट वाचलेली नाही. त्यामुळे सर्व गोष्टी कशा आखल्या आहेत हे मला माहीत नाही, असे प्रज्ञानंदने मुंबईतील धारावी बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. पण मला हे माहीत आहे की, त्या स्पर्धेचा विजेता कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरेल. याचाच अर्थ असा की, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला अजूनही प्राधान्य आहे, असे त्याने नवीन स्पर्धा सध्याच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसमोर काही आव्हान निर्माण करेल का असे विचारले असता सांगितले.
नॉर्वे चेसचे सीईओ केजेल मॅडलँड यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघासोबत (फिडे) चेस वर्ल्ड चॅम्पियनशिप टूरसाठी दीर्घकालीन करार करण्यात आला आहे. या नवीन स्पर्धेला फिडेने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. प्रज्ञानंद म्हणाला की, नवीन स्पर्धांमुळे खेळाडूंना या खेळातून उपजीविका चालविण्याच्या संधी वाढणार आहेत. यात काही खेळाडू रॅपिड आणि ब्लिट्झ प्रकारांकडे वळण्याचाही समावेश आहे.
खेळाडूंना खेळण्यासाठी नवीन संधी मिळत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे, असे तो म्हणाला. स्वरूपाच्या बाबतीत सतत बदल होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे की वाईट हे मला नक्की माहीत नाही. पण एक खेळाडू म्हणून प्रत्येक स्वरुपाशी जुळवून घेणे कधी कधी कठीण जाते, असे प्रज्ञानंदने सांगितले.