हत्तुरगावात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक वर्षाच्या बाळासह चौघे जखमी
सोलापूर प्रतिनिधी
दूध गरम करण्यासाठी गॅस सिलेंडर पेटविल्यानंतर काही कळायच्या आत मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज गावभर घुमल्याने अख्खे गाव जागे झाले. या स्फोटात एक महिला तसेच एक वर्षाच्या बाळासह चौघे भाजून जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली.सोनाली महादुलिंग बबुरे (वय २८), आरुषी महादुलिंग बबुदे (वय ३),मलकारसिध्द महादुलिंग बबुरे (वय १) व शावरसिध्द सिध्दप्पा बबुरे (वय ७०, सर्व रा. हत्तु ता. द. सोलापूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोनाली या कुटुंबासह हत्तुर गावातील मड्डीवस्ती भागात राहण्यास आहेत. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास स्वंयपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरचे बटण सुरू करून तो पेटविला.त्यावेळी अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. काही कळायच्या आतच स्फोटामुळे आगीचे लोळ उठले. यात सोनाली, तीन वर्षाची आरुषी, एक वर्षाचा मलकारसिध्दरव ७० वर्षाचे शावरसिध्द हे भाजले गेले.यात सोनाली यांच्या चेहऱ्यासह हाताला आणि पाठीला भाजले. तर तीन वर्षाची आरुषीचा चेहरा आणि दोन्ही पाय भाजले गेले. एक वर्षाचा शावरसिध्दच्या हाताला, पायाला आणि चेहर्याला भाजून जखमी झाला. तसेच दोन्ही हाताला भाजून शावरसिध्द जखमी झाले. या घटनेनंतर गावातील अशोक कनपवडियार, यल्लप्पा जिणगी व रमेश पाटील यांच्यासह इतरांनी जीपमधून शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून चौघेही शुध्दीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.