कारवारमध्ये डॉल्फिनला जीवदान
कारवार : समुद्राच्या लाटेबरोबर वाहून येऊन किनाऱ्यावर जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या डॉल्फीनला जीवनदान देण्यात आल्याची दुर्मीळ घटना शुक्रवारी गोकर्ण जवळच्या समुद्र किनाऱ्यावर घडली. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळीय परिस्थितीमुळे अरबी समुद्र खवळला आहे आणि लाटांचे रौद्ररूप पहायला मिळत आहे. अशाच एका लाटेच्या तावडीत सापडून सुमारे सहा फूट लांबीचा डॉल्फीन लाटेच्या प्रवांहाबरोबर किनाऱ्यावर तरंगत आला आणि तेथेच अडकून पडला. पाण्याबाहेर फेकल्या गेलेल्या डॉल्फीनला श्वात्सोत्सवास त्रास होऊन जगण्यासाठी संघर्ष करू लागला. ही बाब तेथून जवळ असलेल्या सूर्या रिझॉर्टचे मालक यशवंत महाबळेश्वर गौडा आणि स्थानिक युवक मधु गौडा यांच्या लक्षात आली. अधिक वेळ न दवडता यशवंत आणि मधु यांनी घटनास्थळी धाव घेतली व बृहत आकाराच्या लाटांना दाद न देता जगण्यासाठी संघर्ष करत असलेल्या त्या निष्पाप जलचराला पुन्हा समुद्राच्या पाण्यात ढकलले. यशवंत आणि मधू यांना त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अन्य काही नागरिकांनाही मदत केली. यशवंत आणि मधू यांच्या प्रसंगावधनांमुळे डॉल्फीनला पुनर्जन्म मिळाल्याची चर्चा तेथे रंगली होती. या घटनेवरून चक्रीवादळामुळे आणि खराब वातावरणामुळे जलचरानाही फटका बसतो यावर शिक्कामोर्तब झाले आहे.