जिवंत मुलांप्रमाणे दिसणाऱ्या बाहुल्या
स्पर्श केल्यावर होते अनोखी अनुभुती
जर तुम्हाला बाहुल्या आवडत नसतील तर तुम्ही मार्गरेट शीन यांच्याविषयी जाणून घ्यावे. चित्रपटांमध्ये बाहुल्यांसारख्या खेळण्यांना घाबरविण्यासाठीच वापरले जाते. आजही अनेक मुलांसाठी खेळण्यांमध्ये बाहुलीच महत्त्वाची आहे. परंतु मार्गरेट शीन स्वत:च्या अनोख्या बाहुल्यांद्वारे लोकांचा त्यांच्यासंबंधीचा विचार बदलू इच्छितात. त्यांनी तयार केलेल्या बाहुल्या हुबेहुब जिवंत मुलांप्रमाणे दिसतात, तसेच त्यांना स्पर्श केल्यावर मानवी मुलाला स्पर्श केल्याची अनुभूती होते.
मार्गरेट यांचे काम स्वत:च्या मुलाला गमाविलेल्या महिलांसाठी अत्यंत सहाय्यभूत ठरले आहे. मार्गरेट त्यांना रिबॉर्न म्हणजेच ‘पुन्हा जन्माला येणारी’ संबोधितात. हाताने तयार या बाहुलीचे शरीर अत्यंत काळजीपूर्वक तयार केले जाते. मार्गरेट यांनी दोनवेळा स्वत:चे होणारे मूल गमाविले होते, यानंतर त्यांनी एक बाहुली खरेदी करण्याचा विचार केला. परंतु स्वत: आणि पतीसारखी दिसणारी बाहुली त्यांना मिळाली नाही. यामुळे त्यांनी स्वत:साठीच एक बाहुली तयार केली.
मार्गरेट यांनी स्वत:च्या बाहुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यावर काही लोकांनी ती खरेदी करण्यात रस दाखविला. यानंतर मागील वर्षाच्या नोव्हेंबरपासून त्या अशाप्रकारच्या बाहुल्या तयार करून विकू लागल्या आहेत. त्यांना एक बाहुली तयार करण्यास एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
तर काही लोकांनी मार्गरेट यांच्या बाहुल्यांना खराब देखील ठरविले आहे. तसेच त्यांना मानसिक रुग्ण अशीही टीका सहन करावी लागली आहे. अशा स्थितीत त्यांनी बाहुल्या तयार करण्याचा नाद सोडून द्यायचा विचार केला होता, परंतु आपल्या बाहुल्यांमुळे ज्यांना दिलासा मिळाला त्यांचा विचार करत त्यांनी हे काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.