कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शक्तिपीठ करताय, मग मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण करणार?

06:42 AM Jul 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 46;
Advertisement

सिंधुदुर्गसह 12 जिल्ह्यांतून जाणारा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा रेटा सरकारने लावला आहे. दुसरीकडे या शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. शक्तिपीठ महामार्ग असो किंवा अन्य कोणताही प्रकल्प असो, विकासाच्या दृष्टीने फायद्याचा असेल, तर तो जरुर करायला हवा. मात्र, त्या-त्या ठिकाणच्या स्थानिकांना विश्वासात घेऊन पावले उचलायला हवीत.  शक्तिपीठ महामार्ग करण्याचा रेटा लावला जात असताना गेल्या 17 वर्षानंतरही मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच असून कोकणवासीयांना अजूनही खडतर प्रवास करावा लागत आहे. या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

नागपूर ते गोवा जोडणारा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मात्र, हा शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी विरोधही सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी, विरोधक आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग होईल तेव्हा होईल परंतु त्यापूर्वी ज्या-ज्या महामार्गांची कामे सुरू झालेली आहेत, ती पूर्णत्वास नेणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याची जबाबदारी राज्य शासनाने पार पाडणे आवश्यक आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या प्रस्तावामुळे 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न आता उपस्थित होऊन या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे. त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घेण्यात यावे, अशी समस्त कोकणवासीयांकडून मागणी होत आहे.

Advertisement

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण करावा, अशी मागणी 1983 पासून सुरू झाली होती. त्यानंतर 2007 मध्ये चौपदरीकरण कामाला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्षात 2011 पासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या महामार्गाला मंजुरी मिळून 17 वर्षे झाली, तरी अद्यापही या महामार्गाचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. अजूनही या महामार्गावरुन प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे. या महामार्गाची सद्यस्थिती पाहता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जवळपास पूर्णत्वास गेले आहे. परंतु, या महामार्गाचे काम योग्य तऱ्हेने न झाल्याने अनेक ठिकाणी वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे खारेपाटण ते कलमठ व कलमठ ते झाराप असे दोन टप्प्यात चौपदीकरणाचे काम करण्यात आले आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक सुसाट झाली असली, तरी कासार्डे पेट्रोलपंपानजीक व वेताळबांबर्डे हद्दीत भूसंपादनाची कामे रखडली आहेत. त्याठिकाणी अजूनही अरुंद मार्ग आहे. त्यामुळे वाहनांना या अरुंद मार्गावरुन प्रवास करावा लागतोय. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने रस्त्यावर पाणी साचते आहे. किंबहुना अनेकवेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हिस रोड करतानाही फार अरुंद केले गेल्याने वारंवार वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरण करुन रस्ता केलेला आहे. परंतु त्याठिकाणी ओबडधोबड काम केल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. महामार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नसतानाही गेल्या दोन वर्षापासून ज्या-ज्या ठिकाणी कामे झाली आहेत, त्या-त्या ठिकाणी ख•s पडू लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील गावांना जोडण्यासाठी सर्व्हिस रोड केले आहेत. याच सर्व्हिस रोडवर महामार्गावरील पावसाचे पाणी सोडल्याने पावसाळ्यात धबधब्यांसारखी परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे अनेकवेळा अपघातही झालेले आहेत. अशा प्रकारे अनेक समस्या भेडसावत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले असले, तरी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गाचे काम अद्यापही रखडलेले आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजापर्यंतचा महामार्गावरील प्रवास अतिशय बिकट झालेला आहे. या दरम्यानचे उ•ाण पूल, घाट मार्ग, नदीवरील पुलांच्या बाजूचे रस्ते अर्धवट स्थितीत आहेत. या भागात चालकांना वाहने खूप जपून चालवावी लागत आहेत. त्यामुळे त्यांची अक्षरश: दमछाक होत आहे. त्यामुळे या सर्व त्रासातून जनतेची सुटका होणार कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मंत्री महोदय मुंबई-गोवा महामार्गाचा दौरा करतात आणि गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करतात. या दौऱ्यानंतर प्रत्येकवेळी मंत्रीमहोदय महामार्गाचे काम त्या-त्या वर्षात डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास नेण्याची डेडलाईन देत असतात. गेली पाच ते सहा वर्षे हा नित्यक्रम सुरू आहे. मात्र, डेडलाईन देऊनही अद्याप मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.  गणेशोत्सवाला महिना बाकी आहे. या महिन्यातही रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे कोकणवासीयांना यावर्षीच्या गणेशोत्सवातही महामार्गावरील ख•dयांमधूनच खडतर प्रवास करावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला आता नवीन डेडलाईन दिली असून मार्च 2026 पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. आतातरी ही डेडलाईन पाळली जाणार का हा सुद्धा प्रश्नच आहे. कारण या महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती पाहिली असता, फार मंदावलेली आहे. शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घालण्याऐवजी आधी  मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास न्या, अशी सिंधुदुर्गवासिय मागणी करतोय.

नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यापासून सुरू होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गामध्ये यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून 802 किमी लांबीच्या या शक्तिपीठ महामार्गाला 86 हजार 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार 787 कोटी रुपये तरतुदीला मान्यता दिली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु महामार्ग करत असताना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. कोल्हापूरमध्ये या महामार्गासाठी विरोध आहेच परंतु कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्याच्या सीमेलगत पत्रादेवीपर्यंत जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही काही शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे.

काहींनी हा शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा, अशी मागणी केली आहे. तर काहींनी या महामार्गामध्ये काही बदल करावा, अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गात येणारा शक्तिपीठ महामार्ग आंबोलीतून येत बांदा बाजारपेठेतून जात असल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांनी त्याला विरोध केला आहे. तसेच पर्यावरणाच्यादृष्टीने मोठी हानी होणार आहे. वन्यजीवांनाही धोका निर्माण होणार आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सिंधुदुर्गचा दौरा करत शक्तिपीठ महामार्ग हा केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप करत विकासाऐवजी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. याठिकाणी पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे, असे आरोप करत शक्तिपीठ महामार्गाविरोधात उभ्या राहिलेल्या संघर्ष समितीला त्यांनी बळ देण्याचे काम केले आहे. गेली 17 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण न करता, आणखी महामार्ग या जिल्ह्यातून कशासाठी, असा सवाल करत मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच सागरी महामार्ग, संकेश्वर-रेडी महामार्ग असताना हा आणखी चौथा महामार्ग कशासाठी, असा सवाल उपस्थित करून शक्तिपीठ महामार्ग आम्ही रद्द करुनच दाखविणार, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधाला धार चढली आहे. त्याकरिता आता सत्ताधाऱ्यांना शक्तिपीठ महामार्ग करायचा झाल्यास संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा विरोधकांना शक्तिपीठ महामार्गाचे काय महत्त्व आहे, त्याचा लोकांना काय फायदा होणार आहे हे पटवून द्यावे लागणार आहे. तरच शक्तिपीठ महामार्गाचा विरोध मावळेल. अन्यथा हा संघर्ष अधिक वाढत जाऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची वेळ येईल किंवा रडत-खडत अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाप्रमाणे सुरू राहील. त्यामुळे राज्य सरकारने शक्तिपीठ महामार्ग विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असेल, तर तो जरुर करावा, परंतु शक्तिपीठ महामार्ग करत असताना अन्य मार्ग मंजूर आहेत व ज्यांची कामे सुरू आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे.

संदीप गावडे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article