बेपत्ता बालिकेचा श्वानांकडून शोध
कोडगू जिल्ह्यातील घटना : कॉफी बागायतीत झाली होती बेपत्ता
बेंगळूर : फार्महाऊसमधून बेपत्ता झालेल्या दोन वर्षांच्या बालिकेचा शोध लावण्यात वनखात्याचे कर्मचारी यशस्वी झाले. कॉफी बागायतीमध्ये बेपत्ता झालेल्या बालिकेला वनकर्मचाऱ्यांनी पाळीव कुत्र्यांच्या मदतीने शोधून काढले. ही घटना कोडगू जिल्ह्यातील बी. शेट्टीगेरी गावात घडली. मधमाशी पालन करणारे सुनील आणि नागिणी हे दाम्पत्य पाच दिवसांपूर्वी दक्षिण कोडगू भागातील बी. शेट्टीगेरी वनभागालत कॉफीच्या मळ्यात कामासाठी आले होते. त्यांना सुकन्या नामक दोन वर्षांची मुलगी आहे. शनिवारी सुनील व नागिणी हे कॉफी तोडणीसाठी गेले होते. त्यांनी सुकन्याला इतर लहान मुलांसोबत खेळण्यासाठी सोडले. ते कामावरून परत आल्यानंतर सुकन्या बेपत्ता झाल्याचे आढळले. त्यांनी शोधाशोध केली, इतरांकडे विचारपूस केली. मात्र ती कोठेही सापडली नाही. अखेर गोणिकोप्पलू पोलिसांत तक्रार देण्यात आली.
शोधमोहीमेवेळी वन कर्मचाऱ्यांना वाघाच्या पायांचे ठसे आढळून आले.काही ठिकाणी शिकार झालेल्या प्राण्यांचे अर्धवट मृतदेह देखील सापडले. 30 हून अधिक वनकर्मचारी व अधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत शोध सुरूच ठेवला. रविवारी सकाळी बी. शेट्टीगेरी ग्रा. पं. अध्यक्ष बोपण्णा व त्यांचे मित्र अनिल काळप्पा तसेच ग्रामस्थही शोधकार्यात सामील झाले. अनिल यांनी आपले पाळीव कुत्रे ओरियो, ड्युक, लाला व चुक्की यांना सोबत घेतले. अखेर ओरियोने एका उंच भागात जाऊन भुंकण्यास सुरुवात केली. तेथील एका कॉफीच्या झाडाखाली सुकन्या रात्रभर बसून होती. वनभागाच्या सीमेवर हा भाग होता. अखेर श्वानाने दोन वर्षांच्या बालिकेचा शोध लावला. घटनेनंतर गोणिकोप्पलू पोलीस स्थानकातील अधिकारी प्रदीपकुमार यांनी लहान बालकांच्या सुरक्षेबाबत जनतेला खबरदारी घेण्यासंबंधी सूचना केल्या.