चेर्नोबिलमध्ये श्वान होत आहेत निळे
रहस्यमय बदलामुळे जग हैराण
युक्रेनच्या चेर्नोबिल आण्विक आपत्तीस्थळाच्या नजीक असलेल्या श्वानांच्या छायाचित्रांमुळे जग थक्क झाले आहे. या श्वानांचा रंग आता निळा झाला आहे. या भागातील श्वानांची देखभाल करणाऱ्या डॉग्स ऑफ चेर्नोबिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अनेक निळ्या रंगाचे शिकारी श्वान दिसून येत आहेत. हा बदल केवळ एक आठवड्याच्या आत झाला असून यामागील कारण माहित नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तर अनेक लोकांनी याला 40 वर्षांपूर्वी चेर्नोबिल आण्विक ऊर्जा प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेशी जोडले आहे. डॉग्स ऑफ चेर्नोबिल नावाच्या संस्थेने निळ्या श्वानांची छायाचित्रे शेअर करत याला अनोखा अनुभव संबोधिले आहे. आम्ही नसबंदीसाठी श्वानांना पकडण्याचा प्रयत्न करत होतो. यादरम्यान आम्हाला पूर्णपणे निळ्या रंगाचे तीन श्वान दिसून आले. हे कशामुळे घडले हेच आम्हाला समजत नसल्याचे संस्थेने म्हटले आहे.
जगभरात चर्चा सुरू
आम्ही या श्वानांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे श्वान एखाद्या रसायनाच्या संपर्कात आले असावेत, असे आमचे मानणे आहे. त्यांना पकडणे अवघड ठरत आहे. हे श्वान अत्यंत सक्रीय असून अद्याप त्यांना आम्ही पकडू शकलेलो नाही, असे संस्थेने म्हटले आहे. डॉग्स ऑफ चेर्नोबिलकडून शेअर करण्यात आलेले व्हिडिओ आणि छायाचित्रांवर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेक लोकांनी या श्वानांना वाचविण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक लोकांनी आण्विक धोक्याकडे लक्ष वेधले आहे.
काय घडले होते चेर्नोबिलमध्ये?
1986 मध्ये चेर्नोबिल आण्विक ऊर्जा प्रकल्पात झालेल्या विध्वंसक आण्विक दुर्घटनेनंतरही तेथेच राहिलेल्या पाळीव प्राण्यांचे वंशज असलेल्या श्वानांची डॉग्स ऑफ चेर्नोबिल नावाची संघटना देखभाल करते. आण्विक ऊर्जा प्रकल्पाच्या आसपास 250 हून अधिक भटके श्वान असल्याचे संघटनेचे मानणे आहे. तत्कालीन सोव्हियत संघाच्या चेर्नोबिल येथील आण्विक प्रकल्पात 26 एप्रिल 1986 रोजी विध्वंसक स्फोट झाला होता. या स्फोटात 40 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो कर्मचारी आण्विक किरणोत्सर्गामुळे होरपळले होते.