तोंड आहे का मगरीचा जबडा?
महिलेच्या नावावर सर्वात मोठ्या तोंडाचा विक्रम
तुमचे तोंड किती खुले होऊ शकते याचा विचार कधी केला आहे का? बहुतांश लोक याविषयी विचार करत नाहीत, परंतु अमेरिकेतील एका महिलेने स्वत:च्या तोंडाद्वारे अशी कामगिरी केली आहे की पूर्ण जगच चकित झाले आहे. या महिलेने एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला, तसेच स्वत:च्या तोंडात 10 पॅटीयुक्त बर्गर फिट करून सर्वांना अवाक् केले आहे. अमेरिकेच्या अलास्काच्या केचिकन शहरात राहणाऱ्या या महिलेचे नाव मॅरी पर्ल जेल्मर रॉबिन्सन असून तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळविले आहे. तिच्या तोंडाची रुंदी 7.62 सेंटीमीटर (2.98 इंच) आहे. याचबरोबर ती सर्वात मोठे तोड असणारी महिला ठरली. यापूर्वी हा विक्रम समांथा राम्सडेलच्या नावावर होता, तिच्या तोंडाची रुंदी 2.56 इंच होती.
मॅरीने समांथाचा हा विक्रम मोडला आहे. माझे तोंड अत्यंत मोठे असल्याचे माहित होते, बालपणी मी स्वत:च्या तोंडात विचित्र गोष्टी कोंबून मस्ती करायचे. बल्ब तोंडात टाकत होते. त्यावेळी मी अन्य मुलांना थक्क करायचे. आता याच सवयीमुळे माझ्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेला असल्याचे ती सांगते. मॅरीने एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती स्वत:च्या तोंडात अनेक गोष्टी कोंबताना दिसून येते, यात ती जेंगा ब्लॉक्सचा ढिग, बेसबॉल आणि एक खाण्याचा टिन दिसून येतो. हे माझ्यासाठी नेहमीच एक थट्टेसारखे होते, बालपणी मी साडेतीन जेंगा ब्लॉक्स तोंडात ठेवायचे असे मॅरी सांगते. माझा जबडा काहीसा मागील बाजूला आहे आणि हा माझ्या कानापर्यंत पोहोचत असल्याचे मला वाटते. बहुतांश लोकांना अशाप्रकारचा जबडा नसतो, याचमुळे ते स्वत:चे तोंड अधिक उघडू शकत नाहीत असे ती सांगते. मॅरी आणि तिचा पती मिळून कूरियर कंपनी चालवितात.