जुन्या आरटीओ कार्यालयातील कागदपत्रे नव्या कार्यालयात स्थलांतर
साहित्य हलविताना अधिकाऱ्यांकडून विशेष दक्षता
बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा चौक येथे नवे आरटीओ कार्यालय झाल्याने जुन्या आरटीओ कार्यालयातील साहित्य स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. कॅम्प येथील बीएसएनएल कार्यालयापासून आरटीओ कार्यालयाची सर्व कागदपत्रे व दस्तऐवज वाहनांमधून नव्या आरटीओ कार्यालयात नेण्यात येत आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित लावण्यास आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या आरटीओ कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र खोली बांधली आहे. बेळगाव आरटीओसह प्रादेशिक परिवहन विभागाचे विभागीय कार्यालय या ठिकाणी सुरू करणार आहे. या कार्यालयाचे काम सुरू असताना तात्पुरत्या स्वरुपात आरटीओ कार्यालय कॅम्प येथील बीएसएनएल ऑफिसमध्ये हलविण्यात आले होते. वाहनांच्या जुन्या फाईल, त्यांचे रेकॉर्ड, इतर कागदपत्रे कॅम्प येथील कार्यालयात हलविली होती. आता पुन्हा मुख्य कार्यालयात मागील दोन दिवसांपासून फर्निचर व इतर साहित्य नेण्यात येत आहे. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष दक्षता घेतल्याचे दिसते.
सर्व्हरडाऊनमुळे नागरिक वैतागले
आरटीओ कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत आहे. यामुळे नागरिकांना जुन्या वाहनांचे नूतनीकरण, वाहनावरील कर्जाचा बोजा कमी करणे, यासह इतर कामांसाठी विलंब होत आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आरटीओ कार्यालयात गर्दी झाली होती. परंतु, सर्व्हरडाऊन असल्यामुळे पेमेंट होण्यास विलंब होत होता.