हम जहां खडे होते है ओपीडी वही सुरू होती है'; डॉक्टरांनी भर बाजारात सुरु केला मोफत दवाखाना
विटा प्रतिनिधी
'हम जहाँ खडे होते है, लाईन वही से सुरु होती है!', अमिताभ बच्चन यांचा संवाद खूपच गाजला होता अशीच काहीशी वेळ जिल्ह्याचे सिविल सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या बाबतीत अनुभवायला मिळाली 'हम जहां खडे होते है ओपीडी वही सुरू होती है', असा काहीसा हा अनुभव होता.
वेळ दुपारची, दिवस शनिवारी बाजारचा, माणुस मोठ्या पदाचा पण कोणताही गर्व न बाळगणारा. हा लेंगरेकरांसाठीचा अवलीया सहज उपलब्ध होत असल्याचे अनुभवायला मिळाले. बाजारात लोक भेटतात आणि डाॅक्टराना आपण दुखण सांगतात. डॉक्टर ही त्यांना जागेवरच औषध लिहुन देतात. म्हणुन हे डॉक्टर लेंगरेकरांना आपलेसे वाटतात. ही गोष्ट चित्रपटातली वाटत असली तरी ती सत्य आहे. सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांची लेंगरेकरांच्याविषयी असणारी ही आपुलकी यातुन दिसून येते.
मोफत वात व्याधी व वार्धक्यजन्य आजार व उपचार शिबिराच्या उद्घाटनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक लेंगरे येथे आले होते. उद्घाटनानंतर उपसरपंच राजेंद्र देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले. गावात 'बंडु डॉक्टर' आल्याचे समजताच लोकांनी त्यांच्या भोवती घोळका केला आणि प्रत्येकजण आपली अडचण सांगु लागला, प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत होते.
काही वेळात डॉक्टर बाजारातून निघाले. भर बाजारातील गजबजलेल्या रस्त्यावर लोक, वृद्ध मंडळी भेटायची सर्वानाच बंडू डॉक्टर विचारपूस करून सल्ला द्यायचा. एखाद्याला तिथेच शेजाऱ्याच्या खिशातील कागदावर काही लिहून द्यायचा. जिल्हा शल्य चिकित्सक असणारा आपला मुलगा मोठा डॉक्टर आणि जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहे, हे गावकऱ्यांच्या गावीही नाही. त्यांना बंडू डॉक्टर आपला वाटतो आणि जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनांना गावकरी आपल्या घरातले वाटतात. इथे अहंकाराचा लवलेशही सापडत नाही. मोठ्या मनाचे कदम डॉक्टर लेंगरेकरांना पुन्हा अनुभवायला मिळाले. जिल्ह्यातील मोठ्या पदावर काम करणारा माणूस एवढ्या सहज आणि साध्या पध्दतीने उपलब्ध होतो. हे मात्र कौतुकास्पद असेच असले तरी हा माणुस आपला असल्याने लेंगरेकरांचे भाग्य मोठे असल्याची चर्चा गावात नेहमीच होत असते.
लेंगरे गावचा सुपुत्र असल्याचा अभिमान
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम हे देखील आपल्या या भूमिकेला अनुरूप व्यक्त होतात. ग्रामस्थांनी सत्कार केल्यानंतर मला जिल्हाभर फिरताना अधिकारी म्हणून वावरायला काही वाटत नाही. पण लेंगऱ्यात येताना अधिकारी असल्यासारखे वाटत नाही. मी या गावचा सुपुत्र आहे, याचा अभिमान वाटतो. या गावातील लोकांनी थोरा मोठ्यानी दिलेल्या संस्कारामुळेच मी मोठा झालो. या गावच्या पांढरीत माझे बालपण गेले आहे. त्यामुळे गावची सेवा करण्याची भाग्य मिळाले तर तो ऋणातून उतराई होण्याचा योग समजून मी काम करतो, असे जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम जाहीरपणे बोलून जातात आणि मोठी माणसं मोठी का असतात, याचे उत्तर त्यांच्या सहज वागण्या बोलण्यातून देऊन जातात.