डॉक्टरांनी रुग्णांचे मनोबल वाढवावे!
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आवाहन : बेळगावात केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन
बेळगाव : कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत असून आजही या रोगाचे निदान समजताच रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय हादरतात. केएलई कॅन्सर हॉस्पिटलमध्ये (डॉ. संपतकुमार एस. शिवणगी कॅन्सर हॉस्पिटल) आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार होतीलच. परंतु रुग्णांचे मनोबल वाढवून त्यांच्या जगण्याच्या आशा पल्लवीत होतील यावर डॉक्टरांनी भर द्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. केएलई कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन शुक्रवार दि. 3 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त जिल्हा क्रीडांगणावर आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. व्यासपीठावर केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, केएलई सोसायटीचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री शरणप्रकाश पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, जगभरात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. 2022 मध्ये 20 मिलियन लोकांना या रोगाची लागण झाली. 2025 मध्ये हे प्रमाण 13 टक्क्याने वाढेल, असा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. केएलई कॅन्सर हॉस्पिटलमुळे कॅन्सरग्रस्तांना उत्तम उपचार मिळण्याची सोय झाली आहे. कोणत्याही रोगाचे निदान होण्यास विलंब झाला की त्यातील धोके वाढतात. आजही दुर्लक्ष आणि आर्थिक दुर्बलता यामुळे कर्करोगग्रस्त आणि अन्य रुग्णांनासुद्धा उपचार मिळण्यात अडचणी येतात. यासाठी केएलई हॉस्पिटलने सातत्याने जनजागृती करावी. केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रावर अधिक भर दिला असून आयुष्मान भारतसारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. अलीकडेच त्याची व्याप्ती वाढवून ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा ही योजना लागू केली आहे. आजही आपल्या देशामध्ये महिला व मुलींच्या आरोग्याकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. ही पारंपरिक मानसिकता आपल्याला बदलायची आहे. केएलई सोसायटीच्या बहुसंख्य संस्था या ग्रामीण भागात व निमशहरी भागात आहेत. त्यामुळे केएलई हॉस्पिटलने जनजागृती मोहीम राबविण्यावर भर द्यावा, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.
रुग्णाला दिलासा द्या
वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच डॉक्टरांनी या पेशाचे पावित्र्य लक्षात घ्यावे. कॅन्सरचे निदान झाले की रुग्ण व त्याचे कुटुंबीय हादरतात. केवळ उपचार करणे एवढेच डॉक्टरांचे काम नाही तर तुमच्या स्पर्शाने, तुमच्या बोलण्याने रुग्णाला दिलासा मिळायला हवा. सर्वस्व हरविल्याच्या भावनेने निराश झालेल्या रुग्णाला धीर देत, त्याचे समुपदेशन करून त्याच्या जगण्याच्या आशा पल्लवीत करण्याची जबाबदारी डॉक्टरांची आणि सर्व आरोग्य सेवकांची आहे, हे लक्षात घ्या असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. प्रारंभी राष्ट्रगीत झाले. त्यानंतर केएलई स्कूल ऑफ म्युझिकच्या सदस्यांनी सादर केलेल्या चन्नवीर कणवी लिखित केएलई गीताची ध्वनीमुद्रिका ऐकविण्यात आली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राणी चन्नम्मांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे डॉ. प्रभाकर कोरे व महांतेश कौजलगी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचाही सत्कार केला.
शिवणगी कुटुंबीयांकडून कॅन्सर हॉस्पिटलसाठी 8 कोटीची देणगी
स्वागत प्रास्ताविक करताना डॉ. कोरे म्हणाले, 108 वर्षांपूर्वी 7 दिग्गज मान्यवरांच्या पुढाकाराने व तीन देणगीदारांच्या साहाय्याने केएलई सोसायटीची स्थापना झाली. या सोसायटीच्या 310 हून अधिक संस्था असून 1.45 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बॅ. नाथ पै, डॉ. अनंतकुमार, प्रल्हाद जोशी, बसवराज बोम्माई, सुधा मूर्ती, चंद्रशेखर कंबार, शिवानंद पाटील, अनिल सहस्त्रबुद्धे असे मान्यवर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. या भागात आधुनिक उपचार पद्धतीचा अभाव होता, हे लक्षात घेऊन केएलई हॉस्पिटलची स्थापना झाली. तसेच संपतकुमार शिवणगी व उदया शिवणगी यांनी कॅन्सर हॉस्पिटलसाठी 8 कोटीची देणगी दिली. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे.
-डॉ. प्रभाकर कोरे
प्रादेशिक आरोग्य केंद्रे उभारणे ही काळाची गरज
प्रल्हाद जोशी यांनी भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना येथील जनतेने आरोग्यपूर्ण व कौशल्यपूर्ण असणे आवश्यक आहे. बैठी जीवनशैली व चुकीची आहार पद्धत यामुळे आज आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रादेशिक आरोग्य केंद्रे उभारणे ही काळाची गरज झाली आहे. त्यादृष्टीने केएलई हॉस्पिटल व नव्याने सुरू झालेले कॅन्सर हॉस्पिटल महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करतानाच आपल्या मानवी संवेदना जपाव्यात, असेही प्रल्हाद जोशी म्हणाले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
-केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी