डॉक्टरांची रिक्तपदे कौन्सिलिंगद्वारे भरणार
बैठकीत आरोग्य अन् कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांची माहिती
कारवार : राज्यातील सुपर स्पेशॅलिटी डॉक्टर आणि तज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया यापूर्वीच पार पडली आहे. येत्या काही दिवसांत डॉक्टरांची कान्सिलिंगद्वारे रिक्त असलेल्या जागी नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहभागृहात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील काही रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशॅलिटी आणि तज्ञ डॉक्टरांची कमरता आहे. याची जाणीव सरकारला झाली आहे. डॉक्टर नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून होईल तेवढ्या लवकर डॉकटरांची पोस्टींग करण्यात येईल. राज्यात हार्टअटॅकमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे ही बाब फार गंभीर आहे. हार्टअटॅकमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राज्यातील काही तालुक्यांमध्ये पुनीत हार्टज्योती योजनेची अंमलबजावणी कण्यात येत आहे. ही योजना सर्व तालुक्यांमध्ये विस्तारीत करण्यात येईल, असे सांगून मंत्री गुंडूराव पुढे म्हणाले, हार्ट, छातीत दुखल्यास अशी व्यक्तिंची इसीजी करून उपचार करण्यात येतील.
जखमी झालेल्यांवर मोफत उपचारासाठी ‘हरीश सांत्वन’योजना राबविणार
अपघाताच्यावेळी जखमी झालेल्यांवर मोफत उपचार करण्यासाठी ‘हरीश सांत्वन’ योजना राबविण्यात येत आहे. कारवार जिल्ह्यातही तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. याबद्दल माहिती मिळाली आहे. येथे ही डॉक्टरांची नेमणूक करण्यात येईल. कारवारात सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. येथील सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात सुविधांकडे उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येईल, अशी माहिती पुढे मंत्री गुंडूराव यांनी दिली. यावेळी कारवारचे आमदार सतीश सैल, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया आदी उपस्थित होते.