‘स्पॅडेक्स’ मोहिमेतील डॉकिंग प्रक्रिया लांबणीवर
आता 7 ऐवजी 9 जानेवारीला चाचणी होणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आपल्या ‘स्पॅडेक्स’ मोहिमेंतर्गत डॉकिंग चाचणी पुढे ढकलली आहे. पूर्वनियोजनानुसार ही चाचणी मंगळवार, 7 जानेवारीला होणार होती. मात्र, आता ती 9 जानेवारीला होणार असल्याचे इस्रोकडून सोमवारी जाहीर करण्यात आले. चाचणी पुढे ढकलण्यामागील नेमके कारण इस्रोने सांगितलेले नाही. केंद्रीय भूविज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘स्पॅडेक्स’ मोहिमेला भारतीय डॉकिंग तंत्रज्ञान असे नाव दिले आहे. ही पूर्णपणे आत्मनिर्भर मोहीम असून भारत प्रथमच डॉकिंग चाचणी करणार आहे.
डॉकिंग मिशन अंतर्गत दोन खास डिझाईन केलेले उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत जोडले जातील. ‘स्पॅडेक्स’ मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात प्रवास करणारी दोन यान एकत्र जोडण्यात येणार आहेत. दोन यान एकत्र जोडण्याच्या या प्रक्रियेलाच ‘डॉकिंग’ असे संबोधले जाते. आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीनने या जटिल तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले आहे. आता भारत स्वबळावर ही कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार ताशी 28,800 किलोमीटर वेगाने प्रवास करणारे दोन उपग्रह एकमेकांशी जोडले जातील. या चाचणी अंतर्गत उपग्रहांची सापेक्ष गती सेन्सर्सचा संच वापरून कमी केली जाईल आणि नंतर एकमेकांशी जोडली जाईल. विशेष म्हणजे इस्रोने भारतीय डॉकिंग यंत्रणेचे पेटंट आधीच घेतले आहे.
भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉकिंग ही एक जटिल प्रक्रिया आहे. ‘स्पॅडेक्स’ मोहिमेत टार्गेट आणि चेझर या दोन लहान अंतराळयानांचा समावेश आहे. ही यान पीएसएलव्ही-सी60 रॉकेटमधून 470 किमी उंचीवर वेगळ्या कक्षेत सोडण्यात आली. या टप्प्यात दोन अंतराळयानांना जमिनीवरून मार्गदर्शन केले जात आहे. आता त्यांच्यावर जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यात व्हिजुअल कॅमेऱ्यांचा वापर करून नजर ठेवली जाणार आहे. यशस्वी डॉकिंगनंतर दोन अंतराळ यानांमधील विद्युत ऊर्जा हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक केले जाईल. त्यानंतर स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग होईल आणि ते दोघेही आपापल्या पेलोडचे ऑपरेशन सुरू करतील. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत माहितीचे आदान-प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.