For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी करा

10:26 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम पावसाळ्यापूर्वी करा
Advertisement

खानापूर शहरातील नागरिकांची मागणी : रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर : नगरपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष, त्वरित दुरुस्तीची गरज

Advertisement

खानापूर : शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपंचायतीने पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते. नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातील मुख्य रस्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे मोठे होणार असल्याने शहरातील वाहतुकीला मोठी अडचण होणार आहे.नागरिकांनी मागणी करून देखील शहरातील खड्ड्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने डागडुजी करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.राजा छत्रपती स्मारक ते महाजन खुट्टपर्यंत मुख्य रस्त्यावरच मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळेला वाहतुकीस त्रास होत आहे. तसेच लक्ष्मीनगर जुना मोटर स्टँड बाजारपेठ यासह इतर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले  आहे. मात्र नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करणे धोक्याचे होणार आहे. यासाठी या रस्त्याची तात्पुरती डागडुजी पावसाळ्यापूर्वी नगरपंचायतीने करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत नगरसेवकांनी प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांना सूचना करून रस्त्याची डागडुजी करून घेणे गरजेचे आहे.

 या रस्त्याचा वाली कोण?

Advertisement

खानापूर शिवस्मारक चौक ते नगरपंचायत या 400 मीटर रस्त्याचा वाली कोण? म्हणण्याची वेळ खानापूरवासियांवर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने तसेच काही ठिकाणी रस्ता खराब झाल्याने यावरुन दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवणे जिकीरीचे बनले आहे. राजा छत्रपती चौक ते स्टेशनपर्यंत या रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. या रस्त्यावर पोस्ट ऑफिस, नगरपंचायत कार्यालय, जिल्हा पंचायत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, आयबी, रेल्वे स्टेशन, वनखात्याचे कार्यालय, सर्वोदय हायस्कूल तसेच हा रस्ता असोगा तीर्थक्षेत्रालाही जाणारा आहे. मात्र राजा छत्रपती स्मारकापासून ते नगरपंचायतीपर्यंत रस्ता पूर्णपणे उखडलेला असून गेल्या चार वर्षापासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत आहे.मात्र याकडे नगरपंचायतीने आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याचे सांगून हात वर केलेले आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तातडीने क्रम घेणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी निधी मंजूर केला होता. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम का हाती घेण्यात आले नाही, हे मात्र समजू शकले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अवघ्या चारशे मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत ठेवण्यापेक्षा नगरपंचायतीकडे हस्तांतर करणे गरजेचे आहे. हा रस्ता नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाल्यास नगरपंचायतीकडून या रस्त्याची देखभाल होईल, यासाठी हा रस्ता हस्तांतर करून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.