मास्क मॅन चिन्नय्याची नार्को टेस्ट करा!
सौजन्याच्या कुटुंबीयांची मागणी : एसआयटीचे प्रमुख प्रणब मोहंती यांच्याकडे तक्रार
बेंगळूर : धर्मस्थळमध्ये 2012 साली घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या अत्याचार व खून प्रकरणासंबंधी पीडितेची आई कुसुमावती यांनी नव्याने तक्रार दाखल केली आहे. शेकडो मृतदेह पुरल्याची तक्रार आणि पुरावे दिलेला आरोपी चिन्नय्या याची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी एसआयटीचे प्रमुख प्रणब मोहंती यांच्याकडे केली आहे. धर्मस्थळनजीकच्या पांगाळ येथील विद्यार्थिनी सौजन्या 9 ऑक्टोबर 2012 रोजी मृतावस्थेत आढळून आली होती. 15 वर्षांनंतरही गुन्हेगारांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सौजन्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा न्यायासाठी तक्रार दाखल केली आहे. एसआयटीच्या ताब्यात असणाऱ्या तकारदाराची महत्त्वाची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या महिन्याच्या प्रारंभी मंगळूर जिल्ह्यातील उजीरे येथे झालेल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या चौकशीवेळी तक्रारदाराच्या बहिणीने केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख कुसुमावती यांनी एसआयटी प्रमुखांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तक्रारदार चिन्नय्या याची नार्को टेस्ट केल्याने घटनेची संपूर्ण सत्यता उघडकीस येईल तसेच यामागे कोणाकोणाचा हात आहे, हे उघड होईल, असे सौजन्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. राज्य सरकार आणि एसआयटीकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे कुसुमावती यांनी म्हटले आहे.