जनतेची कामे विनाविलंब करा
लोकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावू नका : मुख्यमंत्र्यांचे काणकोणच्या अधिकाऱ्यांना निर्देश
काणकोण : काणकोणच्या जनतेला सरकारी कार्यालयांतून चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात. लोकांचा वेळ वाया जाऊ देऊ नका, त्याचप्रमाणे लोकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावू नका. विनाविलंब लोकांची काम करा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोणच्या सरकारी अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत कार्यालय प्रमुखांना दिले.काणकोणात लोकांना व्यवस्थित सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही कार्यालयांना जागा अपुरी पडत आहे.
शिवाय काही जागा विनावापर पडून आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली असून त्याअनुषंगाने ही बैठक घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी नंतर बोलताना स्पष्ट केले. काणकोणच्या रवींद्र भवनच्या तालीम सभागृहात घेतलेल्या या बैठकीत सभापती डॉ. रमेश तवडकर, नगराध्यक्षा सारा देसाई, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. बहुतेक कार्यालयांत अनावश्यक वस्तू साठवून ठेवण्यात आल्या आहेत. नको असलेल्या वस्तू हटवाव्यात आणि सर्वत्र स्वच्छता राखण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना दिला.
बंद इमारती अन्य खात्यांना
काणकोण तालुक्यात साधारणपणे 162 सरकारी इमारती आहेत. त्यातील शाळा इमारतींपैकी 26 शाळा इमारती बंद आहेत. या इमारती सरकार ताब्यात घेणार असून त्यांची दुरुस्ती तसेच नूतनीकरण करून विविध खात्यांना त्या देण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. चावडीवरील जुन्या इस्पितळ इमारतीचे नूतनीकरण करून त्या ठिकाणी सीडीपीओ, सब-रजिस्ट्रार, नगर नियोजन कार्यालय हलवावे. श्रीस्थळच्या सरकारी विश्रामधामात अबकारी तसेच वजन व माप कार्यालय स्थलांतरित करण्यात यावे. चापोली येथील आसरास्थळाच्या इमारतीमध्ये अग्निशामक दल स्थलांतरित करावे. तसेच माटवेमळ, खोल येथे आरोग्य केंद्रासाठी शाळा इमारतीची एक खोली द्यावी, असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांना दिला.
नवीन इमारत उभारून सोय करा
काणकोणच्या कृषी भवनचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. केवळ पायाभरणीशिवाय पुढे हे भवन जात नाही. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी कृषी भवनाची सोय करावी तसेच मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित करावे. काणकोणच्या कदंब बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या वाहतूक कार्यालयाला जागा अपुरी पडत असून त्याचे नूतनीकरण करावे, असा निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. आयटीआयमध्ये जी मुले विविध क्षेत्रांत शिकत आहेत त्यांच्याकडून विजेचे त्याचप्रमाणे रंगरंगोटीचे काम करून घ्यावे आणि त्याचा मोबदला त्या मुलांना द्यावा. काणकोणच्या सीडीपीओ कार्यालयात आधारकार्ड नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सांगितलेली कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण व्हावीत
लोकांची कामे अडून राहतात, त्यांची सतावणूक होते अशा तक्रारी आपल्याकडे येता कामा नयेत, असे सांगतानाच ही सर्व जबाबदारी मुख्यमंत्री सावंत यांनी मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविली. ही सर्व कामे 1 डिसेंबरपूर्वी पूर्ण व्हायला हवीत. त्याचदिवशी आपण परत काणकोणला येणार असून एकाच दिवशी नूतनीकरण केलेल्या तीन-चार कार्यालयांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या बैठकीचे आयोजन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण काणकोणातील विविध सरकारी कार्यालयांचा अहवाल मागून घेतला होता आणि त्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.