मद्यपानानंतर लोक खरं बोलतात का?
जाणून घ्या खरं कारण
लॅटिन भाषेत ‘इन विनो वेरितास’ नावाची एक म्हण आहे. याचा अर्थ वाइनमध्ये सत्य दडलेले आहे असा आहे. मद्यपानानंतर लोक खरं बोलतात असे मानले जाते. परंतु प्रत्यक्षात हे खरे आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. मद्याच्या नशेत लोक जे बोलतात त्यात छळ-कपट नसते, प्रामाणिकपणे ते स्वत:चे म्हणणे मांडतात असे मानले जाते.
रोमचे इतिहासकार प्लीनी द एल्डर यांनी मद्यात सत्य दडलेले असते असे म्हटले होते. मद्यपानानंतर लोक समोरच्या व्यक्तीला तू माझा भाऊ आहेस, मी तुझ्यासाठी जीव देखील देऊ शकतो, असे बोलत असतात. मद्यपान केल्यावर व्यक्ती प्रामाणिकपणे बोलत असतो, का या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अध्ययन करण्यात आले.
नॅशनल इन्स्टीट्यूट ऑन अल्कोहोल अब्यूज अँड अल्कोलिजम एपिडेमियोलॉजीचे प्रमुख ऐरोन व्हाइट यांनी मद्यपानानंतर व्यक्ती त्याच्या मेंदूत जे विचार येतात तेच बोलतो असे सांगितले आहे.
मद्यपानानंतर प्रामाणिकपणा वाढतो, याची पुष्टी देणारा कुठलाही पुरावा समोर आला नसल्याचे ऐरोन यांनी म्हटले आहे. उदाहरणार्थ मद्याच्या नशेत एक मित्र दुसऱ्या मित्राला आपण शहर सोडून जातोय, नोकरी सोडतोय असे सांगत असतो, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी असे घडत नाही. तो त्याच शहरात राहत असतो, त्याच ऑफिसमध्ये काम करत असतो. मद्यपानानंतर व्यक्ती खरं बोलेल की नाही हे सांगता येत नाही, परंतु मद्यपानानंतर व्यक्ती अधिक बडबड करू लागतो असे अध्ययनात दिसून आले आहे. स्वत:च्या मेंदूत सुरू असलेले विचार तो व्यक्त करू लागतो. यामुळे लोक मद्याला ‘ट्रुथ सिरम’ असेही म्हणतात.
भावना तीव्र होतात
पीट्सबर्ग युनिव्हर्सिटीत मानसशास्त्राचे प्राध्यापक सायेट्टे यांनी मद्यपानामुळे भावना तीव्र होतात, माणूस अधिक हसू लागतो, अधिक अन् जलदपणे बोलू लागतो असे सांगितले. भावना तीव्र झाल्यास डोक्यात आलेले विचार लोक बोलू लागतात, शुद्धीत शांत राहणाऱ्या माणसाची नशेत प्रतिक्रिया वेगळी होते. मद्य संबंधिताच्या वर्तनाला टोकाच्या स्थितीत पोहोचविते, असे त्यांनी म्हटले आहे