इंद्रायणी भाताला 3000 रुपये दर मिळाल्याशिवाय विक्री करू नका
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कडोलीत काढली जागृती रॅली
वार्ताहर/कडोली
इंद्रायणी भाताला योग्य दर मिळाल्याशिवाय भात विक्री करू नको अशा प्रकारची जागृती करणारी रॅली येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवारी रात्री काढण्यात आली. रॅलीला शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडोली परिसरातील दर्जेदार समजला जाणारा आणि मोठ्या प्रमाणात मागणी असणारा इंद्रायणी भाताचा दर अचानक घसरल्याने येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी तातडीची बैठक घेऊन भात व्यापाऱ्यांना इंद्रायणी भाताला किमान 3000 रूपये दर धावा अन्यथा भात खरेदी करू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या.
याबद्दल रविवारच्या दै. तरूण भारत या दैनिकातून सविस्तर वृत्तांत आल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. या वृताची दिवसभर शेतकरी वर्गात चर्चा सुरू होती. एकंदरीत सामान्य शेतकऱ्यांतही याची जागृती व्हावी यासाठी रविवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दुचाकी मोटर सायकलद्वारे संपूर्ण गावभर रॅली काढली आणि रॅलीद्वारे समस्त शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताला 3000 रुपये पेक्षा जास्त दर मिळाल्यासच इंद्रायणी भाताची विक्री करावी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
भात खरेदी-विक्री बंद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आक्रमक भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना भात खरेदी करू नये अशा प्रकारची सूचना शनिवारी रात्री करण्यात आली होती याची दखल घेऊन भात व्यापाऱ्यांनी रविवारी इंद्रायणी भात खरेदी-विक्री बंद ठेवली होती
रोज 7 ट्रक भात विक्री
कडोली परिसरात कडोली, जाफरवाडी, कंग्राळी, अलतगा, देवगिरी आदी गावच्या शेतकऱ्यांकडून रोज सहा ते सात ट्रक भात विक्री होते म्हणजे. रोज 22 ते 25 लाख रूपयाची विक्री रविवारी ठप्प झाली होती.