रेल्वे परीक्षेला बसणाऱ्यांचे मंगळसूत्र, जानवे काढू नका
रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
प्रतिनिधी/ बेंगळूर
रेल्वे भरती मंडळाच्या नर्सिंग अधीक्षक परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे मंगळसूत्र आणि जानवे काढू नयेत, असे निर्देश रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वे विभागात नर्सिंग अधीक्षक पदाच्या परीक्षा या महिन्याच्या 28, 29 आणि 30 तारखेला होत आहेत. या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी जानवे आणि मंगळसूत्र घालू नये, असे प्रवेश पत्रात नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमण्णा यांनी वरील निर्देश दिले आहेत.
धार्मिक संकेत असलेले जानवे आणि मंगळसूत्र काढण्याबाबत रेल्वे भरती परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केल्याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबत मंगळूरचे भाजप खासदार पॅप्टन ब्रिजेश चौट यांनी हा मुद्दा रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यानंतर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे धार्मिक चिन्ह असलेले जानवे आणि मंगळसूत्र काढू नयेत, असे निर्देश दिले आहेत. सोशल मीडियावर याबद्दल माहिती शेअर करत खासदार ब्रिजेश चौट यांनी रेल्वेमंत्री सोमण्णा यांनी अधिकाऱ्यांना मंगळसूत्र आणि जानवे न काढण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांगितले.