महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माझा उपदेश मानत नाहीत ते मुर्खपणामुळे नष्ट होतात

06:05 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

बाप्पा म्हणतात, परमश्रेष्ठ गती मिळण्यासाठी मनुष्याने नित्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे कर्म मला अर्पण करावे. माणसाने आपापले कर्तव्य प्रसंगानुसार ओळखून ते निरपेक्ष वृत्तीने पार पाडण्यातच त्याचे भले आहे. माणसाला स्वत:च्या आणि इतरांच्या आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने तो इतरांशी स्पर्धा, इर्षा करत असतो. माणसाने इतरांशी इर्षा, स्पर्धा न करता मी सांगितल्याप्रमाणे कर्म करून ते मला अर्पण करावे. म्हणजे तो कर्मबंधनापासून मुक्त होईल. दुसऱ्याच्या पुढे जाण्याच्या नादात अनेक भलीबुरी कर्मे मनुष्य करत असतो. त्यातून निर्माण होणारे पाप, पुण्य त्याच्या गाठीला जोडले जाते. त्यामुळे तो कर्मबंधनात अडकतो. प्राप्त परिस्थितीत समाधानी राहण्यासाठी मी कर्ता नाही हे सदैव लक्षात ठेवावे. त्यासाठी निरपेक्षतेने कर्म करणे, ईश्वराची उपासना करणे आणि आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणे ही साधने करावीत. असे करत गेल्यास ते बाप्पांचे शुभ वचन अनुसरल्यासारखे होत असल्याने तो जसजसा ह्या साधनेत मुरत जाऊन तृप्त होत जाईल तसतसे त्याला मोक्षसुख मिळू लागेल.

Advertisement

बाप्पा त्यांच्या भक्तांचे कल्याण व्हावे म्हणून परोपरीने समजावून सांगत आहेत. आपला भक्त ज्ञानी व्हावा, त्याने स्वत:चा उद्धार करून घ्यावा, त्यासाठी आपण सांगितलेल्या उपदेशाचे तंतोतंत पालन करावे असे प्रत्येक सद्गुरूला वाटत असते. त्यात त्यांचा काहीच फायदा नसतो परंतु शिष्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाने, आपलेपणाने ते वारंवार त्यांच्या शुभवचनाचा पुनरुच्चार करत असतात. बाप्पांनाही त्यांच्या भक्तांकडून तशीच अपेक्षा आहे परंतु समाजात काही लोक असे असतात की, त्यांना बाप्पांनी सांगितलेल्या वचनांचे महत्त्वच वाटत नाही. ते त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, त्यांची चेष्टा करतात. श्रीकृष्णचरित्रातही असे प्रसंग आहेत. भगवंतांना गवळ्याचा पोर म्हणून हिणवणे, त्यांना रणछोडदास म्हणून चिडवणे असे प्रकार त्यांचा द्वेष, मत्सर करणारी मंडळी नेहमीच करत असत. कित्येकांना त्यांचे न्यायाचे बोलणे बिलकुल आवडत नसे. त्यात दुर्योधन, शिशुपाल, जरासंध इत्यादि मस्तवाल मंडळी आघाडीवर होती. पुढील श्लोकात ह्याच मुद्यावर बोट ठेवून बाप्पा म्हणतात असे बिघडलेले लोक माझे शत्रू आहेत असे समज.

ये चैव नानुतिष्ठन्ति त्वशुभा हतचेतस ।

ईर्ष्यमाणान्महामूढान्नष्टांस्तान्विद्धि मे रिपून् ।। 32 ।।

अर्थ-जे कल्याणरहित हतबुद्धि जन याप्रमाणे वागत नाहीत ते ईर्षायुक्त, महामूढ, नष्ट झालेले असून माझे शत्रु आहेत असे जाण.

विवरण-बाप्पा म्हणतात, त्यांनी उपदेश केलेल्या कर्मयोगाचा जे अनादर करतात ते अमंगल विचारांनी घेरलेले असतात. ते सदैव अमंगलाचेच चिंतन करतात. जे माझ्या विचारांची पायमल्ली करतात, माझा मत्सर करतात ते महामुर्ख असतात.  त्यामुळे ते नष्ट झाल्यात जमा असतात. त्यांना आत्मतत्वाचा विसर पडल्याने ते असा मुर्खपणा करत असतात. त्यांना भोग घेण्याची आणि संग्रह करण्याची फार आवड असते. ते त्यालाच सर्वस्व मानतात. त्यामुळे त्यांना कर्म करून ते त्याच्या फळासह मला अर्पण कर हा माझा उपदेश मानवत नाही. ते वेदशास्त्र शिकलेले असले तरी त्याचा उपयोग ते केवळ इतरांना शहाणपणा शिकवण्यासाठी करतात. स्वत: मात्र त्यातून काहीही बोध न घेता त्यांच्या मूळ स्वभावानुसार वागतात. स्वत:च्या स्वभावात कोणतीही सुधारणा करण्याची इच्छा नसलेली, अशी माणसे स्वत:च्या अहंकाराने व दुर्गुणांनी अधोगतीस जाऊन नाश पावतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article