मंगाई यात्रेत प्राणीहत्या नको
पोलीस निरीक्षक सीमानी यांचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
मंगाई यात्रेत प्राणीहत्या करू नका, मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी भाविक येतात. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्धरित्या यात्रा भरविण्यासाठी एकोपा राखणे गरजेचे आहे, असे शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी सांगितले. मंगाईनगर येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी वरील सल्ला दिला.
रविवारी मंगाईनगर रहिवासी संघटना व महिला मंडळांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, आनंद गोंधळी, श्रीधर बिर्जे, प्रशांत हणगोजी, सागर पाटील, भालचंद्र उचगावकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रहिवासी संघटनेच्यावतीने पोलीस अधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी म्हणाले, चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठीही नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. नागरिकांनी सतर्क रहावे. चेनस्नॅचिंग टाळण्यासाठीही खबरदारी घ्यावी.
आपल्या परिसरात वावरणाऱ्या अनोळखींविषयी पोलिसांना माहिती द्यावी. ज्या परिसरात अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत, त्यांनी कॅमेरे लावावेत. गुन्हेगारी प्रकरणांबद्दल नागरिकांनी खबरदारी बाळगल्यास ते थोपविणे शक्य आहे, असे सांगतानाच मंगाई यात्रेसंबंधीही पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.