स्वतःमधील खऱ्या देवाला विसरू नका - प .पू. शोभाताई
सावंतवाडीत काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठात श्रावण सप्ताहाची सांगता
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी : देव नाही असं काहीजण म्हणतात. परंतू, हा देह म्हणजे देवालय आहे. त्यातील देवाला आम्ही विसरलो आहोत. स्वतःमधील खऱ्या देवाला विसरू नका, संतांनी तो देव आपल्याला दाखवला आहे. आपल्या हृदयी हा देव वसला आहे. त्या देवाला जाणा असा उपदेश प.पू. शोभाताई यांनी केला. सावंतवाडी येथील श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळ्यात त्यांनी भक्तगणांना प्रवचन दिले.
सावंतवाडी येथील प.पू. श्री. काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या मठात शुक्रवारी श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांसह दासबोध समास वाचन करण्यात आले. शुक्रवारी काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांच्या प्रमुख उपस्थिती या सप्ताहाची सांगता करण्यात आली. काकड आरती, भजन, दासबोध वाचन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा संपन्न झाला. उपस्थित भक्तांना संत परंपरा, आध्यात्म व समर्थांच्या दासबोधावर गुरुमाऊलींनी प्रवचन दिले. शोभाताईं म्हणाल्या, देव नाही असं काहीजण म्हणतात. परंतू, हा देह म्हणजे देवालय आहे. त्यातील देवाला आम्ही विसरलो. स्वतःमधील खऱ्या देवाला विसरू नका. आत्मा हा शरीराचा आधार आहे. या विश्वाला त्याचा आधार आहे. आपल्या हृदयी हा देव वसला आहे. त्या देवाला जाणा असा उपदेश त्यांनी केला. मनुष्य मेल्यावर त्या शरीराची किंमत शून्य आहे. आपल्याला जी किंमत आहे ती आत्मा अर्थात ब्रम्हांमुळे आहे. जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. शाश्वत केवळ ब्रंम्ह आहे ते चराचरात व्यापलेलं आहे. त्याच्या सामर्थ्यामुळे सर्वकाही आहे. हुशार मुलांकडे जसं शिक्षकांचं लक्ष असतं तसं गुरुंचे लक्ष त्यांच्या शिष्यांकडे असते. संतांच काम अज्ञान घालविण्याचे आहे. संतांच्या उपदेशातून काय शिकायचं हे काम तुमचं आहे. सत्संगात खरी ताकद आहे. त्यामुळे सत्संग धरा, स्वतःच कल्याण करा, गुरूंची साथ सोडू नका असे मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातील भक्तगण उपस्थित होते. रात्री इसोटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड- वेंगुर्ला यांच्या सुश्राव्य भजनाने सोहळ्याची सांगता झाली.