डीएपी-युरियाची कमतरता भासू देऊ नका
जि. पं. सीईओंची रयत संपर्क केंद्रांना सूचना
बेळगाव : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. अशा परिस्थितीत डीएपी व युरियाची कमतरता भासू नये, याची काळजी घेण्याची सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी रयत संपर्क केंद्रातील अधिकाऱ्यांना केली आहे. सोमवारी तेलसंग, ता. अथणी येथील रयत संपर्क केंद्राला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर बोलताना नागरिकांना आवश्यक माहिती द्यावी, उताऱ्यांना आधार जोडणी नियोजित वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना केल्या. या परिसरातील द्राक्ष पिकामुळे झालेल्या समस्या व पिण्याच्या समस्या मांडल्या.
समाधानकारक पावसामुळे सर्व जलाशयात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही. जेजेएम योजनेंतर्गत 24 तास पिण्याची पाणी योजना राबविण्यासंबंधी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच कामाला सुरुवात हाणार आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी विजापूर जिल्ह्यातील तोरवीजवळ 15 हजार मेट्रिक टन कोल्ड स्टोरेज सुरू करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील टेंडर प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात द्राक्ष उत्पादकांना या कोल्ड स्टोरेजचा उपयोग होणार असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले.
तेलसंग ग्राम पंचायत कार्यालयात ओनके ओब्बव्वा जयंती कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. ग्राम पंचायत इमारत, शाळा व अंगणवाड्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याची सूचना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ऐगळी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वत:ची आरोग्य तपासणीही करून घेतली. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी शिवानंद कल्लापूर, कार्यकारी अभियंते वीरण्णा वाली आदींसह विविध खात्यांचे अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.