ज्ञानेश्वरी अध्याय दोन, सारांश 2
भगवंतानी अर्जुनाला आत्म्याच्या अमरत्वाबद्दल सांगितले. आता ते योगबुद्धीबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, माणसाने कर्तव्य पार पाडत असताना कधीही फळाची अपेक्षा करू नये. जो फळाची अपेक्षा करतो त्याची कर्म करायला सुरवातही होत नाही. फळाच्या अपेक्षेत गुंतल्याने तो करत असलेले कर्म अचूक होत नाही. ज्यांच्या हे लक्षात आलेले नाही ते अविवेकी लोक कर्म करून पुण्य मिळवा आणि स्वर्गसुख उपभोगा असा चुकीचा सल्ला देत असतात. त्यासाठी ते वेदांचा हवाला देतात.
खरं म्हणजे माणसाने कर्म टाळू नये म्हणून वेदात स्वर्गसुखाची लालूच दाखवली आहे परंतु मिळणारी फळे तात्पुरती आहेत हे लक्षात आल्यावर माणसाने फळाची अपेक्षा करू नये हे आपोआपच माणसाच्या लक्षात येते. ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे त्याचा समबुद्धीने निर्णय घ्यावा आणि निरपेक्षतेने ते करावे यातच माणसाचे भले आहे. याप्रमाणे कर्म करत राहिल्यास आपण चांगले करतोय की, वाईट हा प्रश्न मनात येत नसल्याने सर्व लक्ष कर्म करण्याकडे केंद्रित होते, त्यामुळे माणसाला कर्मात कौशल्य प्राप्त होते. समबुद्धीने कर्म केल्याने पाप, पुण्याचा संचय होत नसल्याने माणसाचे कर्मबंधन तुटून त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकतो.
समबुद्धीने वागणारा मनुष्य समाधीत स्थिरावतो. तो कशा प्रकारे वागतो, बोलतो ते मला सांगा अशी अर्जुनाने भगवंताना विनंती केल्यावर भगवंत म्हणाले, माणसाच्या इच्छा त्याला गैरवर्तणूक करायला भाग पडतात. म्हणून त्याने सर्व इच्छांचा स्वखुशीने त्याग केलेला असतो. पूर्वकर्मामुळे ओढवलेले सुख-दु:खाचे प्रसंग तो सहजी सोसतो. त्याला कोणत्याही गोष्टीची तृष्णा नसल्याने ती मिळाली नाही तर आपले कसे होईल असे भय त्याला वाटत नाही आणि ती मिळण्याच्या आड जो येईल त्याचा राग त्याला करत नाही. त्यांची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. त्यामुळे ती त्याला स्वत:हून कोणत्याही गोष्टींचे आकर्षण दाखवू शकत नाहीत. त्याला जेव्हा हवी असेल तेव्हाच त्याला आवश्यक तेव्हढीच माहिती ती पुरवतात. त्याला विषयोपभोगांचे आकर्षण नसल्याने त्याबद्दल वाटणारे प्रेम, ते मिळाले नाहीत तर होणारी निराशा, ते मिळण्यासाठी जे आडवे येतील त्यांचा राग इत्यादि गोष्टीपासून तो मुक्त असतो. ज्यांना आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो त्यांनाच विषय त्रास देत असतात. जो विषयांच्या आकर्षणापासून मुक्त असतो त्यांची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात. ज्याच्या हे लक्षात येत नाही तो प्रसन्नता आणि शांती घालवून बसतो.
विषयांच्या आकर्षणाने सामान्य मनुष्य त्याकडे धावत सुटतो अशावेळी समाधीत स्थिरावलेला माणूस मात्र आत्मस्वरुपाला विसरलेला नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याप्रमाणे हा विषयांच्यामागे का धावत नाही याचे इतरांना आश्चर्य वाटते पण मुळात त्याबाबतीत तो निद्रिस्त असतो आणि इतर लोक जेव्हा विषयांच्यामागे धावत असतात तेव्हा तसे करण्याचा मोह होऊ नये म्हणून तो जागरूक असतो.
स्थितप्रज्ञ मनुष्य कितीही दु:ख सोसावे लागले वा सुखाचा महापूर आला तरी शांत असतो. त्याला ही शांती प्राप्त होण्याचे कारण म्हणजे त्याने सर्व इच्छा सोडून दिलेल्या असल्याने तसेच त्याला कुणाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याने त्याला अपेक्षा भंगाच्या दु:खाला सामोरे जावे लागत नाही म्हणून तो शांत असतो. स्थितप्रज्ञ व्यक्तीला सर्वजण समान असल्याने ना त्याला अहंकार असतो ना अपेक्षा. एकदा ही ब्राह्मीस्थिती प्राप्त झाली की, ती अंतकाळपर्यंत कायम टिकते आणि शेवटी त्याला ब्रह्मनिर्वाण मिळवून देते. अध्याय दुसरा सारांश समाप्त