Vari Pandharichi 2025: माउली, तुकोबांना पुणेकरांचा भावपूर्ण निरोप, सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ
संत ज्ञानोबाराय व संत तुकोबाराय यांच्या पालख्यांचा 2 दिवस पुण्यात मुक्काम होता
पुणे : संत ज्ञानेश्वर माउली आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पुणेकरांनी रविवारी भावपूर्ण दिला. त्यानंतर पुणेकरांच्या आदरातिथ्याने भारावलेला हा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. संत ज्ञानोबाराय व संत तुकोबाराय यांच्या पालख्यांचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता.
माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात मुक्कामी होती. तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामास होती. या दोन दिवसांत लाखो भाविकांनी माउली, तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. रविवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, कसबा पेठेसह मंडईचा संपूर्ण परिसर वारकरी व भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
दिंड्यादिंड्यातील अभंगाचा नाद, टाळ मृदंगाचा गजर अन् वारकऱ्यांच्या सहवासाने संपूर्ण पुणे शहर फुलून गेले. पुणेकरांनी या दोन दिवसांत मोठ्या आनंदाने सोहळ्याचे आदरातिथ्य केले. भल्या सकाळी सोहळा मार्गस्थ झाला. माउलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरातून मार्गस्थ झाली. तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर येथून निघाली.
सोहळा बाहेर पडताच पालखीला निरोप देण्यासाठी पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा जमा झाले. शिंदे छत्री येथे माउलींच्या पालखीचा विसावा होता. येथील आरतीनंतर सोहळा पुन्हा मार्गस्थ झाला. हडपसरमध्ये पालखी सोहळा पुन्हा एकत्र येतो आणि त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने चालू लागतो. दोन्ही पालख्यांचा याच परिसरात विसावा असतो. रविवारी दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी हडपसर पंचक्रोशीतील मंडळींनी मोठी गर्दी केली होती.
सोपानकाकांच्या पालखीचं आज प्रस्थान
परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या भेटीनंतर आज दुपारी बारा वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. यासाठी देवस्थानच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली असून सोमवारी दुपारी सोपानदेव विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघणार आहेत..
तुकोबांची पालखी आज यवत, तर माउलींची सासवड मुक्कामी
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे मुक्कामी दोन दिवस राहिल्यानंतर रविवारी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखीच्या आगमन आणि मुक्कामामुळे पुण्यात दोनदिवस उत्साह आणि भक्तीचे वातावरण होते. पुणेकरांनी वैष्णवांच्या मेळ्याचे भक्तीभावाने स्वागत करत त्यांची मनोभावे सेवा केली.
रविवारी ज्ञानोबा माउलींची पालखी सासवड येथे तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी होती. विठूनामाचा गजर करत देहू आणि आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये बंधू सोपानकाकांच्या भेटीसाठी दाखल झाली आहे. माउलींच्या पालखीचा मुक्काम सोमवारीही सासवडमध्येच आहे. तर संत तुकाराम महाराजांची देहूवरून निघालेली पालखी पुण्यात आल्यानंतर हडपसर मार्गे लोणी काळभोरमध्ये पोहोचली.
ती सोमवारी यवत (ता. दौंड) मुक्कामी जाणार आहे. साधूसंत येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे गावागावात आणि चौका चौकात या पालख्यांचं अतिशय उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत होतंय.