ज्ञान प्रबोधन मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव : ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात ‘आजी-आजोबा’ दिन, प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन व दहावीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आऊट परेड असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक महेश भिरंगी उपस्थित होते. महेश भिरंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आधुनिक युगात प्रत्येकाच्या जीवनात बदल होत आहेत. या बदलात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. मुलांमध्ये सृजनशिलता वाढविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधींचे सोने करणे आवश्यक आहे. महात्मा गांधीजींच्या म्हणण्यानुसार स्वत:मध्ये असा बदल करा की त्या बदलामुळे तुम्ही दुसऱ्यांना प्रेरित कराल. गांधीजींच्या या विचारांप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वास्तूविशारद प्राजक्ता देशपांडे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, शिकण्याची प्रक्रिया ही अखंडपणे चालू असते. या प्रक्रियेबरोबरच आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात करिअर घडवा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. मान्यवरांच्या हस्ते शाळेची उत्कृष्ट विद्यार्थिनी राष्ट्रीय जलतरणपटू सुनिधी हलकारे हिला सन्मानित करण्यात आले. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाळेचे नूतन पंतप्रधान आदीनारायण प्रभूखोत याने पदभार स्वीकारला. प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. शाळेचे ट्रस्टी वसंत सामंत, विवेक कामत, जगदीश कुंटे, अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रविशंकर, प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग यांसह विद्यार्थ्यांची उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी पाटील, दैविक हणबर, सान्वी सतीश, अंशुमन यांनी केले. पाहुण्यांची ओळख भूवी भट्ट, वेदिका ओऊळकर यांनी करून दिले. युग उंदरे यांनी मनोगत सादर केले. पावणी भोजवानी व गाया जैन यांनी आभार मानले.