For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, सिनेर, स्वायटेक, बेन्सिक उपांत्य फेरीत

06:00 AM Jul 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  सिनेर  स्वायटेक  बेन्सिक उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविच तसेच इटलीचा जेनिक सिनेर यांनी पुरुष एकेरीत तर पोलंडची इगा स्वायटेक आणि स्वीसची बेलिंडा बेन्सिक यांनी महिला एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष एकेरीच्या झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने इटलीच्या फ्लेव्हीओ कोबोलीचा 6-7 (6-8), 6-2, 7-5, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. जोकोविचचा ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील हा एक नवा विक्रम असून त्याने आतापर्यंत ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेच्या इतिहासात 52 वेळा उपांत्यफेरी गाठली आहे. तसेच विम्बल्डन स्पर्धेत त्याने 14 व्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी जोकोविच आणि स्वीसचा रॉजर फेडरर यांनी विम्बल्डन स्पर्धेत प्रत्येकी 13 वेळा उपांत्यफेरी गाठली होती. जोकोविचने फेडररचा हा विक्रम मागे टाकला. जोकोविचने 2007, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 साली या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. जोकोविच आणि कोबोली यांच्यातील हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना 3 तास 11 मिनिटे चालला होता. आता जोकोविच आणि इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनेर यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या 23 वर्षीय जेनिक सिनेरने अमेरिकेच्या दहाव्या मानांकित बेन शेल्टनचा 7-6 (7-2), 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोविच आणि सिनेर यांच्यात शुक्रवारी उपांत्य फेरीची लढत होईल. स्पेनच्या अल्कारेझने या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठताना आंद्रे रुबलेव्हचा 6-7 (5-7), 6-3, 6-4, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला होता. अल्कारेझ आता या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. अमेरिकेच्या टेलर फ्त्झिने उपांत्य फेरी गाठली असून त्याची पुढील लढत अल्कारेझबरोबर होणार आहे.

Advertisement

बेन्सिक, स्वायटेक उपांत्य फेरीत

महिला एकेरीमध्ये पोलंडच्या इगा स्वायटेक तसेच स्वीसच्या बेलिंडा बेन्सिक यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. स्वायटेकने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 19 व्या मानांकित सॅमसोनोव्हाचा तर बेन्सिकने सातव्या मानांकित रशियाच्या नवोदित मीरा अॅन्ड्रीव्हाचा पराभव केला. आता साबालेंका आणि अॅनिसिमोव्हा तसेच स्वायटेक आणि बेन्सिक यांच्यात उपांत्य लढती होतील. पोलंडच्या स्वायटेकने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने 19 व्या मानांकित लूडमिला

सॅमसोनोव्हाचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्वीसच्या बिगर मानांकित बेलिंडा बेन्सिकने रशियाच्या सातव्या मानांकित मीरा अॅन्ड्रीव्हाचे आव्हान 7-6 (7-3), 7-6 (7-2) असे संपुष्टात आणले. 2019 नंतर बेन्सिकने पहिल्यांदाच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेत 1998 साली स्वीसच्या मार्टिना हिंगीसने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी बेन्सिक ही स्वीसची पहिली टेनिसपटू आहे.

टेनिसपटूंना दंड

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत काही टेनिसपटूंकडून टेनिसकोर्टवर बेशिस्त वर्तन होत असल्याने अखिल इंग्लंड टेनिस क्लबतर्फे अशा टेनिसपटूंना दंड केला आहे. या स्पर्धेत शपथ घेताना काही टेनिसपटू मोठ्या आवाजाचा वापर करतात. तसेच पंचांच्या निर्णायावर नाराजी व्यक्त करताना टेनिस रॅकेट्स फेकल्या जातात. अशा अखिलाडू वृत्तीच्या टेनिसपटूंना स्पर्धा आयोजकांकडून दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.