For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जोकोविच, साबालेन्का, गॉफ उपांत्य फेरीत

06:59 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जोकोविच  साबालेन्का  गॉफ उपांत्य फेरीत
Advertisement

मेदवेदेव्हची उपांत्यपूर्व लढत हुरकाझशी, युक्रेनची यास्त्रेम्स्का शेवटच्या आठमध्ये दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने अमेरिकेच्या टेलर फिट्झवरील वर्चस्व कायम राखत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणाऱ्या अन्य खेळाडूंत बेलारुसची आर्यना साबालेन्का, अमेरिकेची कोको गॉफ यांचा समावेश आहे. याशिवाय रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

36 वर्षीय जोकोविचने 12 व्या मानांकित फ्रिट्झवर 7-6 (7-3), 4-6, 6-2, 6-3 अशी मात केली. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची जोकोविचची ही विक्रमी 48 वी वेळ आहे. यापूर्वी जोकोविच व फ्रिट्झ यांच्यात आठ लढती झाल्या होत्या आणि त्या सर्व जोकोविचनेच जिंकल्या होत्या. 2021 मध्ये येथे दोघांत पाच सेट्सची झुंजार लढत पहावयास मिळाली होती. एकूण 25 वे व येथील 11 वे जेतेपद मिळविण्यास जोकोविच प्रयत्नशील आहे.

पुरुष एकेरीत रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हची उपांत्यपूर्व लढत बुधवारी ह्युबर्ट हुरकझशी होईल. या दोघांत आतापर्यंत पाच लढती झाल्या असून त्यापैकी 3 हुरकाझने व दोन मेदवेदेव्हने जिंकल्या आहेत.

साबालेन्का, गॉफ उपांत्य फेरीत

महिला एकेरीत विद्यमान विजेत्या साबालेन्काने नवव्या मानांकित बार्बोरा क्रेसिकोव्हाचा 6-2, 6-3 असा धुव्वा उडवित उपांत्य फेरीत स्थान मिळविले. कोको गॉफविरुद्ध तिची उपांत्य लढत होईल. साबालेन्काने सलग सहाव्यांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या वर्षी यूएस ओपन अंतिम लढतीत साबालेन्का व गॉफ यांच्यात लढत झाली होती आणि त्यात गॉफने विजय मिळवित जेतेपद पटकावले होते. मार्टा कोस्ट्युविरुद्ध चौथ्या मानांकित कोको गॉफने दोन मॅचपॉईंट्स वाचवत पहिल्या सेटमध्ये 1-5 अशा पिछाडीवरून टायब्रेकरमध्ये हा सेट जिंकला. तीन तास आठ मिनिटे रंगलेली ही झुंज गॉफने 7-6 (8-6), 6-7 (3-7), 6-2 अशी जिंकली. गेल्या सप्टेंबरमध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर गॉफने ग्रँडस्लॅम स्पर्धेत सलग 12 सामने जिंकले आहेत.

महिला एकेरीतील अन्य एका सामन्यात युक्रेनच्या पात्रता फेरीतून आलेल्या डायाना यास्त्रेम्स्काने दोनवेळची चॅम्पियन बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरी गाठली. डायानाने ही लढत 7-6 (8-6), 6-4 अशी जिंकत आगेकूच केली. तिची पुढील लढत जागतिक 50 व्या मानांकित लिंडा नोस्कोव्हाशी होईल. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी यास्त्रेम्स्का ही 2016 नंतरची पहिली पात्रता फेरीतून आलेली खेळाडू आहे. यापूर्वी 2016 मध्ये क्वालिफायर झँग शुआईने या स्पर्धेची उपांत्यपूर्व गाठली होती.

Advertisement
Tags :

.